महिलांनो गरज पडल्यास कालीमाता बना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:29 AM2021-07-17T04:29:49+5:302021-07-17T04:29:49+5:30
सातारा : ‘महिलांनो तुम्ही कमकुवत नाही, आत्मनिर्भर व्हा. तुमच्याकडे कोणी वाईट नजरेने पाहत असेल तर त्याला धडा शिकवा. गरज ...
सातारा : ‘महिलांनो तुम्ही कमकुवत नाही, आत्मनिर्भर व्हा. तुमच्याकडे कोणी वाईट नजरेने पाहत असेल तर त्याला धडा शिकवा. गरज पडेल तेथे कालीमाता, दुर्गामाता बना. अशावेळी राज्य शासन तुमच्याबरोबर राहील,’ असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिलांना दिला.
महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्पाचे ऑनलाईन उद्घाटन मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते झाले. उद्घाटनानंतर त्यांनी संवाद साधला. सातारा येथील पोलीस करमणूक केंद्रात झालेल्या या कार्यक्रमास गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील, जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती सोनाली पोळ, नगराध्यक्षा माधवी कदम आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ‘महिलांनी आत्मनिर्भर झाले पाहिजे. तुमचे अनुकरण संपूर्ण देशाने केले पाहिजे. साताऱ्याचेच नव्हे तर राज्यातील पोलीस सदैव तुमच्या पाठीशी राहतील. आता महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्पामुळे महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे एक पाऊल पुढे पडले आहे.
गृहराज्यमंत्री देसाई म्हणाले, ‘पोलीस विभागातील ज्या महिला व पुरुष कर्मचाऱ्यांना ज्युडो, कराटे येत आहेत. अशा कर्मचाऱ्यांकडून शाळा आणि महाविद्यालयातील मुलींना स्वत:ची सुरक्षा कशी करता येईल यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्पामुळे छेडछाडी, अपप्रवृत्तींना आळा बसण्यास मोठी मदत होणार आहे. याचबरोबर चार्जशीट वेळेत दाखल करणे, गुन्हा नोंदविणे, तपासाला गती मिळणार आहे. गुन्ह्यांचेही प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पाचे परिणाम चांगले दिसल्यास राज्यात राबविण्यात येईल.’
चौकट :
ईडीच्या कारवाईला राजकीय वास...
पोलीस करमणूक केंद्रातील कार्यक्रमानंतर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी महाराष्ट्रात ईडीची कारवाई सुरू आहे. त्याला कुठेतरी राजकीय वास येत आहे. ईडीचा वापर राजकारणासाठी व्हायला नको. जरंडेश्वर कारखान्याबाबतही जिल्हा बँकेने खुलासा केला आहे. नियमानुसार कारखान्याला कर्ज दिल्याचे सांगितले आहे. सहकारात चांगले काम असणाऱ्यांनी भिण्याचे कारण नाही, असे स्पष्ट केले.
फोटो ...
.........................................................