महिलांनो, गणेश मंडळांच्या पदाधिकारी बना!--खास मुलाखत

By admin | Published: September 29, 2015 09:53 PM2015-09-29T21:53:34+5:302015-09-30T00:04:45+5:30

पोलीस अधीक्षकांचे आवाहन : शिस्तबद्ध विसर्जन मिरवणुकीची परंपरा अशीच कायम ठेवा... सर्वांचाच आनंद शतगुणित करा--

Women, become the office bearers of Ganesh Mandal! - Special interview | महिलांनो, गणेश मंडळांच्या पदाधिकारी बना!--खास मुलाखत

महिलांनो, गणेश मंडळांच्या पदाधिकारी बना!--खास मुलाखत

Next

राजीव मुळ्ये -सातारा  -गणेशोत्सवात महिला रांगोळ्या काढतात, जिवंत देखाव्यांमध्ये अभिनय करतात, मिरवणुकीत ढोल वाजवतात... पण उत्सवाच्या निर्णयप्रक्रियेत त्या कधी येणार? सातारकरांनो, यंदा तुम्ही समंजसपणाची परंपरा सुरू केली आहे. आता गणेश मंडळांच्या अध्यक्षपदासह इतर काही पदे महिलांना देऊन ही परंपरा आणखी मजबूत करा!
हे आवाहन आहे साताऱ्याचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांचं. डॉल्बीच्या दणदणाटापासून मुक्ती आणि सर्वसमावेशक, शिस्तबद्ध मिरवणूक याविषयी ‘लोकमत’शी बोलताना डॉ. देशमुख खूपच समाधानी दिसले. ‘मिरवणुकीत सहभागी होणं हा केवळ मोजक्या कार्यकर्त्यांचा नव्हे, तर आबालवृद्धांचा हक्क आहे. हा हक्क त्यांच्यापासून हिरावून घेऊ नका. डॉल्बीबरोबरच चित्रविचित्र नृत्ये आणि हावभाव येतातच. अशी नृत्ये महिला, ज्येष्ठ नागरिक पाहू शकत नाहीत. मोजक्या कार्यकर्त्यांची हौस पूर्ण होते; पण बहुसंख्य नागरिक आनंदापासून वंचित राहतात. यावर्षी मिरवणूक सर्वसमावेशक झाली. महिलांनी मोठ्या संख्येनं मिरवणुकीत भाग घेतला. ज्येष्ठ नागरिकांना आनंद लुटता आला. हाच कार्यकर्त्यांच्या समजूतदारपणाचा विजय आहे,’ असं ते म्हणाले.
डॉ. अभिनव देशमुख यावर्षी मिरवणूकमार्गावर दिवसा आणि रात्रीही स्वत: उपस्थित होते. त्यावेळी अनेकजण त्यांना आवर्जून भेटायला आले. हातात हात घेऊन त्यांनी अधीक्षकांचं अभिनंदन केलं. अशी मिरवणूक, अशी शिस्त आणि असा आनंद पूर्वी कधीच मिळाला नव्हता, असं सांगितलं. भेटायला येणाऱ्यांमध्ये कुटुंबांची संख्या सर्वाधिक होती, हे डॉ. देशमुखांनी मुद्दाम नमूद केलं.
गेल्या वर्षी मिरवणूक सुरू असताना राजपथावर भिंत कोसळून तिघांचा बळी गेला. मदतकार्य झाल्यानंतर ते मंगळवार तळे परिसरात गेले होते. शेवटच्या गणपतीचं विसर्जन करताना मोजके कार्यकर्तेच उपस्थित होते. पोलिसांनी विसर्जनाला मदत केली. ही आठवण सांगून ते म्हणाले, ‘शिस्तबद्धतेबरोबरच कालबद्धताही आवश्यक आहे. लयीत निघालेली मिरवणूक सर्वांनाच आनंद देते. यावर्षी मंगळवार तळ्यात विसर्जन करायचे नाही, हे जवळजवळ निश्चित होते; पण खासगी मालकीमुळं हा निर्णय घेणं प्रशासनाच्या दृष्टीनं अवघड होतं. परंतु खासदार उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट भूमिका घेतली आणि आमचं काम सोपं झालं. जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. प्रतापसिंह शेतीशाळेची जागा जिल्हा परिषदेच्या मालकीची आहे. तिथं कृत्रिम तळं खोदण्यास परवानगी मिळाल्यानंतर पालिकेनं मोठं काम अत्यंत गतीनं केलं. त्याबद्दल नगराध्यक्ष सचिन सारस आणि मुख्याधिकारी अभिजित बापट कौतुकास पात्र आहेत. सर्वांच्याच श्रमातून नियोजन प्रत्यक्षात येऊ शकलं.’


सातारकरांनी यंदा सकारात्मक भूमिका घेतली. त्यांच्या सहकार्यामुळंच विसर्जन मिरवणूक शांततेत आणि उत्साहात पार पडली. भविष्यात मूर्तींची उंची कमी करून सातारकर आणखी कलात्मक, कल्पक आणि सर्वसमावेशक उत्सव साजरा करतील, याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. सातारकरांचा समंजसपणा आणि कल्पकतेवर माझा ठाम विश्वास आहे.
- डॉ. अभिनव देशमुख,
पोलीस अधीक्षक



‘लोकमत’चं विशेष अभिनंदन
‘लोकमत’ने डॉल्बीमुक्तीच्या दिशेनं उत्सवाच्या सहा महिने आधीच पावलं उचलली होती. केवळ बातम्या न देता लोकभावना लक्षात घेणं आणि ती स्पष्टपणे मांडणं आवश्यक असतं. मोजके कार्यकर्ते वगळता डॉल्बी कुणालाच नकोय, हे ओळखून ‘लोकमत’नं प्रबोधनाचं काम हाती घेतलं. त्यामुळं जिल्ह्यात विविध गावांमध्ये डॉल्बीबंदीचे ठराव झाले आणि उत्सव आनंददायी झाला, असं मत डॉ. देशमुख यांनी व्यक्त केलं.
देखाव्यांचा दर्जा आवडला
यंदा साताऱ्याती मंडळांनी सादर केलेल्या देखाव्यांचा दर्जा डॉ. देशमुख यांना खूपच आवडलाय. डॉल्बीमुळं खर्चात झालेल्या बचतीचा या उत्तम दर्जाशी निश्चितच संबंध आहे, असं ते मानतात. विशेषत: डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित देखावा, बुरुजावरून उतरणारी हिरकणी, २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यावर आधारित देखावा, महात्मा फुलेंपासून आजअखेर शिक्षणपद्धतीचा आढावा घेणारा देखावा हे अधीक्षकांना आवडलेले काही देखावे. शिक्षणपद्धतीच्या देखाव्यात तर सुमारे १५० जण सहभागी झाले होते. उत्सवात असाच लोकसहभाग वाढायला हवा, असं ते म्हणाले.

Web Title: Women, become the office bearers of Ganesh Mandal! - Special interview

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.