ओढ्याच्या पुरात महिला गेली वाहून, मृतदेह सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 02:49 PM2019-08-02T14:49:07+5:302019-08-02T14:50:43+5:30
वेळे कामथी, ता. सातारा येथील लता विजय चव्हाण (वय ५०) या ओढ्यातील पुरामध्ये वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. शेतातून घरी परतत असताना ही दुर्देवी घटना गुरूवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.
किडगाव : वेळे कामथी, ता. सातारा येथील लता विजय चव्हाण (वय ५०) या ओढ्यातील पुरामध्ये वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. शेतातून घरी परतत असताना ही दुर्देवी घटना गुरूवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, शेतामध्ये भातलागण करून लता चव्हाण या अन्य महिलांसह घरी येत होत्या. तीन महिला एकमेकींचा हात धरून पुरातून वाट काढत हळूहळू पुढे जात होत्या. मात्र, चव्हाण यांचा अचानक हात सुटला. त्यामुळे त्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेल्या. गावकऱ्यांनी त्यांचा शोध घेतला असता रात्री सव्वासात वाजता खडकजाई ओढा परिसरात त्यांचा मृतदेह सापडला. जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.
गेल्या चार दिवसांपासून वेळे कामठी परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. त्यामुळे ओढ्यांना पूर आला आहे. चव्हाण यांच्या पश्चात मुलगा नामदेव चव्हाण हे एकुलते एक असून ते दिव्यांग आहेत.