दोन गावांतील महिलांची एकमेकींना शिव्यांची लाखोली, महाराष्ट्रातील 'या'गावात आगळी-वेगळी परंपरा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 12:24 PM2022-08-04T12:24:10+5:302022-08-04T12:25:03+5:30
ही प्रथा आज २१ व्या शतकातही सुरू आहे. ही प्रथा बंद करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अनेक प्रयत्न केले. मात्र, बोरीचा बार ही प्रथा बंद पडली नाही.
खंडाळा : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील वेगळेपण जपणारा उत्सव म्हणून ‘बोरीचा बार’ ओळखला जातो. सुखेड-बोरी या दोन गावांतील महिला गावच्या सीमेवरील ओढ्याजवळ येऊन एकमेकींना शिव्यांची लाखोली वाहण्याची ही परंपरा शेकडो वर्षांपासून आजही जपली आहे. दोन वर्षांच्या कोरोनानंतर यावर्षी उत्साहात सोहळा संपन्न झाला. विशेषतः खंडाळ्याचा ‘बोरीचा बार’ सोशल मीडियातून सातासमुद्रापार पोहोचला आहे.
सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी चक्क शिव्यांची लाखोली वाहण्याचीच परंपरा आहे. सुखेड-बोरी या दोन गावांच्या दरम्यान असलेल्या ओढ्यालगत दरवर्षी नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी ‘बोरीचा बार’ रंगतो. एकमेकींना शिव्या दिल्या जातात. संगतीला डफडे अन् हलगीचा कडकडाट आणि तुतारीची ललकारी सुरू असते. याच निनादात दोन्ही बाजूकडील महिलांमध्ये उत्साह संचारतो.
सुखेड व बोरी या दोन्ही गावांतील शेकडो महिला वाजतगाजत ग्रामदेवताचे दर्शन घेऊन गावाच्या वेशीवरील सरहद्देच्या ओढ्यावर येऊन पावसाच्या संततधारेत ‘बोरीचा बार’ घालतात. वर्षातून एकदाच उत्साहाने शिव्यांची लाखोली वाहिली जाते. त्यानंतर प्रतिस्पर्धी गटातील महिलेला ओढून आणले जाते. या महिलेला गावात नेऊन साडीचोळी देऊन ओटी भरली जाते. जगावेगळा हा सोहळा पाहण्यासाठी जिल्ह्यातूनच नव्हे, तर परजिल्ह्यातून हजारो लोक दाखल होत असतात. यावर्षी मोठ्या उत्साहात हा समारंभ पार पडला.
दंतकथा अन् प्रथा...
या बोरीच्या बार संदर्भात एक दंतकथा आहे. एक पाटील होते. त्यांना दोन बायका होत्या. पैकी एक सुखेड, तर दुसरी बोरी या गावातील होत्या. त्या दररोज दोन्ही गावांची शिव असणाऱ्या ओढ्यावर धुणे धुण्यासाठी येत होत्या. ओढ्यावर दोघी एकत्र आल्यावर त्यांच्यात वाद होऊन दोघी एकमेकींना हातवारे करीत शिव्या द्यायच्या. यावरून या ‘बोरीचा बार’ अशी प्रथा असल्याचे ग्रामस्थ सांगतात. ही प्रथा आज २१ व्या शतकातही सुरू आहे. ही प्रथा बंद करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अनेक प्रयत्न केले. मात्र, बोरीचा बार ही प्रथा बंद पडली नाही.
‘बोरीचा बार’ हा आगळावेगळा पारंपरिक उत्सव म्हणून महाराष्ट्रात ओळखला जातो. दरवर्षी मोठ्या उत्साहात ही परंपरा जोपासली जाते. यासाठी लोकांची मोठी गर्दी होत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून हा उत्सव सातासमुद्रापार पोहोचला आहे. - रमेश धायगुडे, सुखेड
सांस्कृतिक परंपरेतील या वेगळ्या उत्सवामुळे बोरी गावचे नाव महाराष्ट्राच्या नकाशावर कोरले आहे. दोन्ही गावांतील महिला आनंदाने सहभागी होतात. त्वेषाने शिवीगाळ होत असली तरी त्यानंतर प्रेमाने एकमेकांशी वागतात. - मयूरी धायगुडे, बोरी