बारविरोधात महिलांनी उठविला आवाज!

By admin | Published: December 31, 2015 10:38 PM2015-12-31T22:38:49+5:302016-01-01T00:10:15+5:30

विंगमध्ये दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार : विशेष ग्रामसभेत महिलांचा एकमताने ठराव; गावातून फेरी

Women raised voice against bar | बारविरोधात महिलांनी उठविला आवाज!

बारविरोधात महिलांनी उठविला आवाज!

Next


विंग : येथे नोव्हेंबर महिन्यात झालेल्या ग्रामसभेत देशी-विदेशी व बिअरबारच्या परवान्यावरून खडाजंगी झाली. तेव्हा ३० डिसेंबरला विशेष ग्रामसभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याअनुषंगाने ३० डिसेंबरला महिलांची विशेष ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेत एकमतांनी महिलांनी नवीन परवाने न देण्यावर शिक्कामोर्तब केला तसेच चालू परवाने रद्द करण्यासाठी पुढील प्रक्रिया करण्याचा ठराव मंजूर केला.
विंग गावामध्ये सध्या एक परमिटरूम बिअरबार आहे तर गावामध्ये जवळजवळ दहा ते बारा ठिकाणी दारूची अवैद्य विक्री होते. यामध्ये देशी-विदेशी, बिअर या सर्व प्रकारची दारू राजरोसपणे विकली जाते. याचा नाहक त्रास गावकऱ्यांना तर होतोच तसेच शासनाचा देखील तोटा होतो. या सर्व अवैद्य धंद्यासाठी कुणाचातरी वरदहस्त आहे. या सर्वांत भरीस भर म्हणून गावामध्ये नवीन व्यावसायिकांचे देशी-विदेशीसाठी एक आणि बिअरबारसाठी पाच अर्ज आहे आणि याची चिड समाजातील सुज्ञ लोकांना आली. त्यांच्या घरोघरी जाऊन लोकांनी जागृती केली आणि भविष्यातील धोके सर्वांना सांगून त्यांच्यात जागृती निर्माण केली. त्या अनुशंगाने महिला बहुसंख्येने ग्रामसभेस उपस्थित राहिल्या व आपले मत मांडले.
दारूबंदीसाठी गावामध्ये एक सामाजिक चळवळ उभी राहिली. गावामध्ये मागील चार ते पाच दिवस फक्त या एकाच विषयावर चर्चा होत होती आणि याचे फलित म्हणून महिला घराबाहेर पडल्या. महिलांनी ग्रामसभेत आपली मते अतिशय परखडपणे मांडली. त्यांच्या भावनेचा तो उद्रेकच होता आणि अपेक्षा होती. गावामध्ये संपूर्ण दारूबंदी घडलीही तसेच महिलांच्या पुढे कुणाचेच काही चालले नाही. नवीन अर्जांना मंजुरी द्यायची नाही व आहे त्या परवान्यांना स्थगिती द्यायची असा ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी मनीषा कुंभार, शकुंतला घोडके, उज्ज्वला पाटील यांनी आपली मते मांडली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच शंकरराव खबाले होते. तत्कालीन ग्रामसेवक एम. ए. पाटील यांनी प्रशासकीय कामकाज पाहिले. तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. (वार्ताहर).


बाटली आडवी : महिलांची जोरदार घोषणाबाजी
विंग गावात प्रथमच ऐतिहासिकरीत्या महिलांची दारूबंदीबाबत जनजागृती फेरी निघाली. महिलांनी गावात दारूबंदी झालीच पाहिजे, गाव दारूमुक्त झालेच पाहिजे, अशा घोषणांनी परिसर दणाणून टाकला. त्यामुळे गावातील आबालवृद्धांना याची तीव्रता लक्षात आली. दरम्यान, स्वनजा पाटील, प्रभावती शिंदे, वैजयंता खबाले यांनी प्रभावी भाषणे केली तर फेरीचे नेतृत्त्व रेश्मा पाटील, शारदा खबाले, कुसुम पाटील यांनी केले.

गावची वाटचाल एका सकारात्मक विचाराकडे चालली आहे. आज सर्वसामान्य स्त्रियांनी रस्त्यावर उतरून हे सिद्ध केले आहे. त्यांच्या भावना व विचार यांचा बारकाईने विचार करून त्याची अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा आहे.
- भीमराव खबाले, ग्रामस्थ, विंग


दारूमुळे लोकांचे संसार उद्ध्वस्त होतात आणि कुटुंबाची विल्हेवाट लागते. गावातील तरुणपिढी सुधारण्यासाठी आणि त्यांची प्रगती होण्यासाठी हा धाडशी निर्णय घेतला
पाहिजे.
- रेश्मा पाटील, ग्रामस्थ, विंग


दारूमुळे माझे पती मृत्युमुखी पडले आणि माझ्या संसाराची राखरांगोळी झाली. दारूसारखे विष यापुढे या गावातून हद्दपार केले पाहिजे तरच गावाची प्रगती होईल आणि संसार सुखाचे होतील.
- प्रभावती शिंदे, ग्रामस्थ, विंग

Web Title: Women raised voice against bar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.