महिलांनो, एसटी चालवायचीय? व्हा पुढं!
By admin | Published: March 8, 2015 12:11 AM2015-03-08T00:11:04+5:302015-03-08T00:15:29+5:30
महिलांसाठी २,२५३ जागा : दहा वर्षे आरक्षण देऊनही भरतीकडे पाठ ; म्हणूनच जड वाहतूक शिकविण्यासाठी
‘लोकमत’नं घेतलाय आजपासून पुढाकार
जगदीश कोष्टी ल्ल सातारा
महिला रेल्वे चालविते. वैमानिकही आहे; पण एसटी बसचे स्टेअरिंग हाती घेण्याचे धाडस तिने दाखविलेले नाही. एसटी चालवायला महिला ‘नको ग बाई’ म्हणत आहेत. राज्यात २,२५३ जागा महिलांसाठी राखीव ठेवूनही प्रशासनाच्या पदरी निराशा येत आहे. म्हणूनच ‘लोकमत’नं ‘जागतिक महिला दिना’चं औचित्य साधून होतकरू महिलांसाठी अवजड वाहतूक अल्प दरात शिकविण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
प्रत्येक महिला स्वयंसिद्धा बनायला हवी, यासाठी शासकीय नोकरीत तिला तीस टक्के आरक्षण दिले आहे. प्रत्येक क्षेत्रात महिलांनी कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. राज्य परिवहन महामंडळ याला अपवाद ठरत आहे. इतिहासात विभाग नियंत्रकपद पहिल्यांदाच एका महिलेकडे गेले आहे. सातारची कन्या यामिनी जोशी या नाशिकला विभाग नियंत्रकपदी कार्यरत आहेत. त्यांच्याबरोबरच आणखी एक सावित्रीची लेक विभाग सांभाळत आहे. पूर्वी वाहकपदावरही पुरुषांचीच मक्तेदारी होती; पण आरक्षणाचा फायदा महिला घेऊ लागल्या, तेव्हा ग्रामीण लोक तोंडात बोटे घालत होते. महिला वाहक हे आता विशेष वाटत नाही. महिलांनी चालकपदासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
राज्य परिवहन महामंंडळाच्या ३१ विभागांमधून चालकाची ‘मेगा भरती’ होत आहे. भरती होणार असलेल्या ७,७०४ चालकांपैकी तीस टक्क्यांप्रमाणे २,२५३ जागा महिलांसाठी आरक्षित ठेवल्या आहेत. या जागी उमेदवार न मिळाल्यास सालाबादप्रमाणे त्या जागी पुरुष उमेदवाराचा विचार होणार आहे. वास्तविक पाहता एसटी चालविणे खूप कष्टाचे आहे, असेही नाही. मात्र, तरीही महिलांमध्ये एवढा निरुत्साह का आहे, याचा विचार प्रशासनाने करावा लागणार आहे.
चालक निरव्यसनी असावा, यासाठी एसटी प्रयत्न करत असते, मात्र तरीही दहा वीस टक्के चालक व्यसनी असल्याचे प्रशासनही नाकारत नाही. त्यामुळे अपघातांचा धोका निर्माण होत असतो. महिलांना या पदावर नेमणूक केल्यास अपघातांचे प्रमाण निश्चित घटणार आहे.
उचला फोन अन् साधा संपर्क...
सातारा जिल्ह्यात ११६ महिला चालकांच्या जागा केवळ उमेदवार नसल्यामुळे रिक्त आहेत. जर या ठिकाणी महिला आल्या नाहीत तर नाईलाजाने पुरुषांची भरती करावी लागणार आहे. केवळ जड वाहन चालविता येत नाही किंवा चालविण्याची संधी कधी मिळाली नाही म्हणून या चांगल्या नोकरीपासून शेकडो महिला दूर राहिल्या. म्हणूनच ‘लोकमत’ने ‘जागतिक महिला दिना’चे औचित्य साधून महिलांसाठी हा उपक्रम सुरू केलाय. ज्यांना जड वाहतूक शिकायची इच्छा आहे, त्यांनी तत्काळ खालील क्रमांकावर संपर्क साधावा. मानसिक व शारीरिकदृष्ट्या सक्षम असलेल्या महिलांना अत्यंत अल्प दरात अवजड वाहतुकीचे प्रशिक्षण दिले जाईल. तसेच एसटी महामंडळाच्या खात्यातील चालकाच्या नोकरी संदर्भात योग्य ते मार्गदर्शनही केले जाईल. मग वाट कशाची पाहताय.. एसटी बस चालवायचीय ना... मग... उचला फोन अन् साधा संपर्क...
काय आहे मानसिकता
एसटीतून दररोज हजारो लोक प्रवास करतात. यामध्ये ग्रामीण प्रवासी जास्त आहेत. त्यामध्ये मद्यपी, महाविद्यालयीन तरुणांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या क्षेत्रात काम करणे महिलांना असुरक्षित वाटत असावे.
एसटीची सेवा चोवीस तास असते. अनेकदा मुक्कामाची गाडी घेऊन जावे लागते. त्यामुळे त्याठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था असेल की नाही याबाबत शंका असते.
एसटीत चालकपदी भरती व्हायचे असल्यास उमेदवाराकडे अवजड वाहन चालविण्याचा परवाना तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून बॅच बिल्ला काढलेला असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे तीन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. या किचकट प्रक्रियेमुळे चालकांपेक्षा वाहकच होणे पसंत केले जाते.
का आहे आवश्यकता?
निरव्यसनी चालकांमुळे अपघातांचे प्रमाण घटेल.
महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निकालात निघेल.
आरक्षण देऊनही लाभ न घेणे भविष्यासाठी धोक्याचे
प्रवाशांना विनम्र सेवा मिळू शकते, त्यामुळे खासगी वाहतुकीला तोंड देता येईल.