महिलांनी शाश्वत उपजीविका निर्माण करावी
By admin | Published: March 29, 2016 10:13 PM2016-03-29T22:13:13+5:302016-03-29T23:52:57+5:30
मकरंद पाटील : महाबळेश्वर तालुक्यातील महिलांच्या कर्तृत्वाचा पंचायत समितीतर्फे गौरव
महाबळेश्वर : ‘महिला शक्ती वेगळी ठेवून कोणताही देश प्रगती करू शकत नाही. त्यामुळे येणारे शतक हे महिलांचे असून, महिलांनी बचतगटांच्या माध्यमातून बँके कडून मिळणाऱ्या अर्थ साह्यांचा लाभ घेऊन विविध प्रकारचे प्रशिक्षण घेऊन शाश्वत उपजीविका निर्माण करावी व प्रत्येक कुटुंबाने आर्थिक सक्षम व्हावे,’ असे आवाहन वाई, खंडाळा व महाबळेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार मकरंद पाटील यांनी केले.
जागतिक महिला दिन, आंतरराष्ट्रिय पर्यावरण दिन व शहीद दिन यांचे औचित्य साधून पंचायत समितीच्या वतीने तालुक्यातील महिला सरपंच व सदस्या, बचतगटांच्या सदस्या, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका, आरोग्य सेविका, महिला मंडळे यांचा मेळावा व प्रशिक्षण महाबळेश्वर पंचायत समितीने आयोजित केला होता.
महाबळेश्वर पंचायत समितीच्या वतीने आयोजित केलेल्या महिलांच्या मेळाव्याच्या निमित्ताने स्त्री शक्तीचा जागर यावेळी पाहावयास मिळाला. यावेळी आमदार शशिकांत शिंदे, बाळासाहेब भिलारे, संजय गायकवाड, राजेंद्रशेठ राजपुरे, नितीन थाडे, दिलीप शिंदे, उज्ज्वला तोष्णीवाल, विमल पार्टे, संगीता वाडकर, अर्पणा सलागरे, रेहाना मानकर, प्रज्ञा पवार, किसनशेठ शिंदे, वंदना वळवी, उमा शेडगे सहभागी झाले होते.
ज्यांच्या प्रेरणेतून व संकल्पनेतून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले ते बाळासाहेब भिलारे यांनी हा तालुका अतिदुर्गम क्षेत्रामध्ये मोडत असून, अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यातून आता महिलांची मोठी शक्ती निर्माण झालेली आहे. या शक्तीचा वापर एम.आर.ई.जी.एस अंतर्गत कामे करून आर्थिक मदत व गावातील कामे करण्यासाठी करण्याचा तसेच बचत गटांना अधिकाधिक व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी प्रशिक्षण देणे, महिला ग्रामसभा, लोकसहभाग याबाबत जाणीव जागृती करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. यावेळी तालुक्याचे नावलौकिक वाढविण्यासाठी वैशिष्टपूर्ण योगदान दिलेल्या १९ पुरस्कार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
रायगड येथील प्रशांत देशमुख यांनी ‘जगणं सुंदर आहे’ यावर व्याख्यान दिले. सिकंदर शेख यांन प्रास्ताविक केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे विस्ताराधिकारी सुनील पारठे यांनी सूत्रसंचालन केले. सहा. गट विकास अधिकारी नारायण घोलप यांनी परिचय करून दिला. अप्पा जाधव यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)