महिलांनी अन्याय सहन करू नये : चाकणकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 07:04 PM2020-01-21T19:04:38+5:302020-01-21T19:05:05+5:30
महिलांच्या आरोग्यासाठी फलटण शहर व तालुक्यात सॅनिटरी नॅपकिनचे मशीन घेऊन सॅनिटरी नॅपकिन दरमहा फलटण येथील विद्यार्थी, युवती व महिलांना देण्यात यावेत. अत्यंत कमी दरात किंवा मोफत सॅनिटरी नॅपकिन दरमहा देण्याचा उपक्रम येथे सुरू करावा.’
फलटण : ‘महिला या अतिशय सहनशील असतात. त्यांच्यामध्ये सहन करण्याची ताकद असली तरी त्यांनी अन्याय सहन करू नये. महिलांनी स्वावलंबी बनून कुटुंबाची प्रगती साधावी,’ असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला सेलच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले
फलटण येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात आयोजित राष्ट्रवादी महिला संवाद मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी आमदार दीपक चव्हाण, नगरसेविका सुभद्राराजे नाईक-निंबाळकर, नगराध्यक्षा नीता नेवसे, पंचायत समितीच्या उपसभापती रेखा खरात, राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षा रेश्मा भोसले, मेघा सहस्त्रबुद्धे, रेश्मा देशमुख, सुनंदा जाधव, दीपाली निंबाळकर, वैशाली चोरमले, वैशाली अहिवळे, ज्योत्स्ना शिरतोडे, लतिका अनपट, भावना सोनवलकर, कांचन निंबाळकर, सुनीता मोरे उपस्थित होत्या.
चाकणकर म्हणाल्या, ‘महिलांचे सबलीकरण करण्यासाठी मला राज्यात सर्वत्र बोलावे लागते. परंतु त्या सर्व योजना फलटणमध्ये उत्तमरीत्या सुरू असल्याने मला बोलण्यासाठी आता काहीच उरले नाही. महिलांच्या आरोग्यासाठी फलटण शहर व तालुक्यात सॅनिटरी नॅपकिनचे मशीन घेऊन सॅनिटरी नॅपकिन दरमहा फलटण येथील विद्यार्थी, युवती व महिलांना देण्यात यावेत. अत्यंत कमी दरात किंवा मोफत सॅनिटरी नॅपकिन दरमहा देण्याचा उपक्रम येथे सुरू करावा.’
‘राज्यात आता महाविकास आघाडीचे सरकार आहे. शरद पवार यांनी या वयात सत्ता आणण्यासाठी आणि भाजपला सत्तेपासून दूर सावरण्यासाठी घेतलेले कष्ट कधीही विसरता येणार नाही. या सरकारच्या माध्यमातून महिलांच्या सुरक्षितता आणि सबलीकरणाला प्राधान्य देण्यात येणार आहे. आयुष्याच्या शेवटच्या भागात तू माझ्यासाठी काय केलं? असे प्रश्न मुलांना उपस्थित करू देऊ नका. महिलांनी स्वावलंबी बना. पुरोगामी विचारांचा स्वीकार करा. कुटुंबाची प्रगती साधा.’ असे आवाहन चाकणकर यांनी केले.
आमदार दीपक चव्हाण म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या माध्यमातून महिलांच्या सबलीकरण व सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबविण्यात येत असताना त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केल्याचे नमूद करीत खासदार शरद पवार यांनी महिलांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले. त्यांच्यामुळेच महिलांना ५० टक्के आरक्षण मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी राज्यभर अतिशय प्रभावीपणे कार्यरत असून, रुपाली चाकणकर यांनी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून अतिशय चांगले काम केले.’