स्त्रियांनी दडपण न ठेवता अन्यायाला वाचा फोडावी : तेजस्वी सातपुते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 10:10 PM2019-12-24T22:10:05+5:302019-12-24T22:11:40+5:30
‘वाढत्या महिला अत्याचारांबाबत समाजही सकारात्मक जागृत होत असल्याचे चित्र आहे. समाजामधील ज्या महिलांनी संघर्ष करून आपले ध्येय गाठले आहे, अशा महिलांच्या प्रेरणादायी यशकथांना माध्यमांनी चांगल्या पद्धतीने प्रसिद्धी द्यावी, यामुळे महिलांच्या विकासाला मदत होईल.
सातारा : ‘आजही आपल्या समाजातील महिलांना स्वत:विषयी असलेल्या कायद्यांची माहिती नाही. आपल्यावर अन्याय झाला तरी त्या अन्यायाला सामाजिक दडपणापोटी कुठेही दाद मागत नाहीत, ही मानसिकता बदलली पाहिजे,’ असे आवाहन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात बुधवारी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने महिला सुरक्षा विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले हाते. यावेळी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते बोलत होत्या. या कार्यशाळेला दिवाणी न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रवीण कुंभोजकर, उपजिल्हाधिकारी (महसूल) विद्युत वरखडकर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या समन्वयक अॅड. मनीषा बर्गे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी आदी उपस्थित होते.
सातपुते पुढे म्हणाल्या, ‘वाढत्या महिला अत्याचारांबाबत समाजही सकारात्मक जागृत होत असल्याचे चित्र आहे. समाजामधील ज्या महिलांनी संघर्ष करून आपले ध्येय गाठले आहे, अशा महिलांच्या प्रेरणादायी यशकथांना माध्यमांनी चांगल्या पद्धतीने प्रसिद्धी द्यावी, यामुळे महिलांच्या विकासाला मदत होईल. तसेच शासनाच्या महिलांसाठी असणाऱ्या योजनांची मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली पाहिजे.’
जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमाचे अॅड. सुचित्रा घोगरे-काटकर यांनी सूत्रसंचालन केले.
महिलांसाठी ताकदीचे कायदेही अस्तित्वात
पुरुषांच्या खाद्यांला खांदा लावून महिला काम करीत आहेत. ज्या ठिकाणी महिला काम करीत आहे, अशा ठिकाणी महिला तक्रार निवारण समिती असते. अत्याचार झाल्यास या समितीकडे दाद मागावी. १८ वर्षांखालील लैंगिक अत्याचार झालेल्या मुलींना तीन लाखांपर्यंतची मनौधैर्य योजनेंतर्गत मदत केली जाते. महिला सुरक्षेबाबत शासन तत्पर असून, जेवढ्या प्रमाणात समाजामध्ये विकृती येत आहे, तेवढ्याच ताकदीचे कायदेही अस्तित्वात येत आहेत. अत्याचारग्रस्त महिलांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत मोफत विधी व सहाय्य दिले जाते, याचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कुंभोजकर यांनी केले.