महिलांना चिंता बचत गटाच्या कर्जफेडीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:40 AM2021-05-27T04:40:32+5:302021-05-27T04:40:32+5:30

तरडगाव : फलटण तालुक्यातील गोरगरीब व मध्यमवर्गीय महिलांनी विविध खासगी फायनान्स कंपन्यांकडून बचत गटाच्या माध्यमातून घेतलेले कर्ज हे सध्याच्या ...

Women worry about self-help group debt repayment | महिलांना चिंता बचत गटाच्या कर्जफेडीची

महिलांना चिंता बचत गटाच्या कर्जफेडीची

Next

तरडगाव : फलटण तालुक्यातील गोरगरीब व मध्यमवर्गीय महिलांनी विविध खासगी फायनान्स कंपन्यांकडून बचत गटाच्या माध्यमातून घेतलेले कर्ज हे सध्याच्या कोरोना परिस्थितीमुळे फिटेनासे झाले आहे. काहींनी कर्ज प्रकरण नवे-जुने केले आहे, तर अनेक महिला परतफेड करू शकल्या नाहीत. गत वर्षापासून सुरू असलेल्या संचारबंदी व लॉकडाऊनच्या या खेळात आयुष्याच्या डाव मोडकळीस आला असताना कर्जाची परतफेड कशी करायची, या विवंचनेत बऱ्याच महिला आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून विविध खासगी फायनान्स हे महिलांना कर्ज वाटप करीत आहेत. बचत गटामार्फत तालुक्यातील प्रत्येक गावांत गरजू महिलांना १५ ते २५ हजारांपर्यंत कर्ज दिले गेले आहे. कोरोनाचा संसर्ग पसरण्यासपूर्वी महिलांचा सर्व व्यवहार सुरळीत सुरू होता. ठरवून दिलेले कर्जाचे हप्ते वेळेवर जात. मात्र, कोरोनामुळे महिलांच्या हाताला व कुटुंबातील कर्त्या पुरुषाला काम मिळणे कठीण होऊन बसले. यामुळे जिथं घरचा रोजचा खर्च भागविणे मुश्कील झाले तिथे हप्ते कसे भरायचे, याची चिंता लागून राहिली आहे.

सध्याची परिस्थिती लक्षात घेता काही फायनान्स कंपन्यांकडून हप्ते मागितले जात नसले तरी व्याजाची रक्कम वाढत आहे. काही प्रतिनिधी हे हप्ते घेण्यासाठी घरी येत आहेत. महिलांकडे पैसे नसल्याकारणाने संबंधितांमध्ये किरकोळ शाब्दिक वाद होतो, तर काही वसुली प्रतिनिधी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत महिलांकडे पैसे नसल्याचे ओळखून माघारी जातात, तसेच ज्यांची आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी आहे, अशा महिला प्रामाणिकपणे काही ठराविक रक्कम प्रतिनिधीकडे देत कर्जाचा डोंगर कमी करतानादेखील दिसत आहेत.

चौकट..

संसाराचा गाडा हाकताना अडचणी...

याउलट काहींना लॉकडाऊन म्हणजे हे एक पैसे न भरण्यासाठी कारणच झाले आहे, तसेच बचत गटाच्या या मेळ्यात अशा पण काही महिला आहेत की ज्यांना कोरोनामुळे कर्जमाफी होईल, असे वाटत आहे. एकूणच बिकट परिस्थिती बनलेल्या अनेक महिलांना पैशाअभावी संसाराचा गाडा हाकताना कर्जाची परतफेड कशी करायची, याची काळजी वाटत आहे.

Web Title: Women worry about self-help group debt repayment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.