‘सिव्हिल’च्या पुरुष कर्मचाऱ्यांची सुरक्षा महिलांच्या हाती !
By admin | Published: July 6, 2017 11:52 PM2017-07-06T23:52:25+5:302017-07-06T23:52:25+5:30
‘सिव्हिल’च्या पुरुष कर्मचाऱ्यांची सुरक्षा महिलांच्या हाती !
दत्ता यादव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्हा शासकीय रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांवर रुग्णांच्या नातेवाइकांकडून होत असलेले आरोप आणि कामामध्ये सुसूत्रता यावी, या हेतूने जिल्हा रुग्णालयाने पुरुष सुरक्षारक्षकांच्या सोबतीने रुग्णालयाची सुरक्षा रणरागिणींच्या हाती सोपविली आहे.
जिल्हा रुग्णालयामध्ये यापूर्वी रुग्णांच्या नातेवाइकांकडून तोडफोडीचे प्रकार घडले आहेत. एवढेच नव्हे तर सिव्हिलमध्ये असलेल्या सुरक्षारक्षकांना धक्काबुक्की आणि खोट्या आरोपांना सामोरे जावे लागले होते. त्यामुळे नेमके काम कसे करावे, असा प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा होता. सकाळी आणि दुपारी रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची व्हिजीट असते. यावेळी रुग्णांना भेटण्यास कोणालाही आतमध्ये सोडले जात नाही. परंतु असे असतानाही सुरक्षा रक्षकांशी हुज्जत घालण्याचे प्रकार वाढले होते. तसेच रुग्णांच्या महिला नातेवाइकांकडून वाट्टेल तसले आरोप होऊ लागले होते. या साऱ्या प्रकाराला वैद्यकीय अधिकारीच नव्हे तर सुरक्षारक्षकही हतबल झाले होते. त्यामुळे यावर उपाय म्हणून पुरुष सुरक्षारक्षकांसमवेत महिला सुरक्षा रक्षकांचीही नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोई यांनी तातडीने महिला सुरक्षारक्षक नेमण्यासाठी हालचाली केल्या. दोनच दिवसांत महिला सुरक्षारक्षकांनी सुरक्षिततेची जबाबदारी उचलली आहे.
यापुढे तोडफोड अन् दंगा होऊ देणार नाही !
कायद्याचा गैरवापर करून आमच्यावर गुन्हा दाखल होईल, याची धास्ती वाटत होती. मात्र आता मनात कसल्याही शंका राहिल्या नाहीत. महिला सुरक्षा रक्षकांची नेमणूक केल्याने जिल्हा रुग्णालयाला एकप्रकारचे बळ मिळाले आहे. त्यामुळे यापुढे तोडफोड अन् दंगा रुग्णालयात कसलाही होऊ देणार नाही, असे एका सुरक्षारक्षकाने आपल्या भावना ‘लोकमत’जवळ व्यक्त केल्या.