महिला लोकशाही दिनाची ‘ऐशी की तैशी’

By admin | Published: October 26, 2014 09:19 PM2014-10-26T21:19:19+5:302014-10-26T23:26:55+5:30

भगिनींनी फिरविली पाठ : वर्षभरात केवळ नऊ तक्रारी

Women's Democracy Day 'Aashi Ki Taishi' | महिला लोकशाही दिनाची ‘ऐशी की तैशी’

महिला लोकशाही दिनाची ‘ऐशी की तैशी’

Next

सातारा : महिला लोकशाही दिनाकडे महिलांनीच पाठ फिरविली आहे. राज्यभरातील महिला सघटनांनी आग्रह केल्यानंतर शासनाने महिला लोकशाही दिन सुरू केला. मात्र, सातारा जिल्ह्यातील तक्रारी लक्षात घेता वर्षभरात केवळ नऊच तक्रारी दाखल झाल्या असल्याची माहिती पुढे आली आहे. परिणामी महिला लोकशाही दिनाबाबत महिलांमध्ये जागरुकता करण्यात प्रशासन कमी पडल्याचे चित्र आहे. महिलांना त्यांच्या वैयक्तिक व हक्कांसंदर्भातील तक्रारी मांडण्यासाठी त्यांना सभामंचक मिळाल्यानंतरही त्या मागे का पडत आहेत, यावर जिल्हा प्रशासनाने आत्मचिंतन करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया आता उमटत आहे.
विविध सामाजिक सेवाभावी संस्था तसेच राज्यभरातील महिला संघटनांनी स्वतंत्र महिला दिनाची मागणी केल्यांनतर शासनाने जून २०१३ पासून महिलांसाठी स्वतंत्र लोकशाही दिन सुरू केला. महिलांच्या तक्रारी राहू नयेत, त्यांना योग्य न्याय मिळावा, समस्याग्रस्त महिलांना त्यांचे प्रश्न मांडता यावेत, या पाठीमागचा प्रमुख उद्देश होता. शासनानेही लोकशाही दिनाच्या माध्यमातून महिलांसाठी स्वतंत्र सभामंचक उपस्थित करून दिल्यामुळे महिलांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा होती. याच्या अंमलबजावणीची जबाबदारी महिला व बालकल्याण विभागाकडे सोपविली. त्यानुसार प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी महिला लोकशाही दिन होऊ लागला.
वर्षभरात दहा महिला लोकशाही दिन झाले. त्यातून केवळ नऊ महिलांनी तक्रार अर्ज केले आहेत. महिलांना स्वतंत्रपणे आपल्या समस्या मांडता याव्यात, या उद्देशाने सुरू केलेल्या लोकशाही दिनाकडेच महिलांनी पाठ फिरविल्यामुळे प्रशासनही विचारात पडले आहे. मुळात महिलांसाठी स्वतंत्र लोकशाही दिन घेऊनही त्यामध्ये सहभागी होऊन आपल्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यास महिला पुढे येत नसल्याचे चित्र आहे. एरव्ही लोकशाही दिनास कधी-कधी अधिकारी फिरकत नसतात, ही बाब खरी असली तरी महिला लोकशाही दिनास सहभागी महिलाच येत नसल्याचे चित्र आहे. यासंदर्भात शासन महिला लोकशाही दिनाबाबत जागृती करण्यास कमी पडत असल्याचे दिसून येत आहे.
ग्रामीण भागापर्यंत या कार्यक्रमाची कल्पनाच पोहोचलेली नाही. प्रभावी जागृतीचा अभाव हे एकमेव कारण महिला लोकशाही दिन अयशस्वी होण्यामागचे आहे. किमान या वर्षभरात तरी याबाबत जागृती करण्यास जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करण्याची मागणी पुढे आली
आहे. (प्रतिनिधी)

आचारसंहितेचा फटका
महिलांना या लोकशाही दिनात सहभागी व्हायचे असेल तर आपली लिखित तक्रार दोन प्रतीत महिला लोकशाही दिनापूर्वी किमान पंधरा दिवस आधी जिल्हास्तरावर महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे दाखल करावी लागणार आहे. त्याचबरोब प्रत्यक्ष लोकशाही दिनादिवशी मूळ अर्ज व कागदपत्रांसह उपस्थित राहणे आवश्यक आहे. दरम्यानच्या काळात लोकसभा निवडणूक, ग्रामपंचायत निवडणूक आणि पुणे विभागीय पदवीधर तसेच शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने काही महिने लोकशाही दिन झालाच नाही. यानंतर विधानसभा निवडणूका आल्या त्या कालावधीत तर लोकशाही दिन झालाच नाही.

Web Title: Women's Democracy Day 'Aashi Ki Taishi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.