आडव्या बाटलीसाठी महिलांचा एल्गार
By admin | Published: May 2, 2017 11:54 PM2017-05-02T23:54:15+5:302017-05-02T23:54:15+5:30
आडव्या बाटलीसाठी महिलांचा एल्गार
ग्रामसभांमध्ये ‘तुफान आलं या’ : भविष्यात कोणत्याही परिस्थितीत परवानगी न देण्याचा निर्धार
सातारा : राष्ट्रीय व राज्य महामार्गापासून काही अंतरावर दारूविक्री करणारे दारू दुकान व बिअर बार बंद करण्याचा निर्धार राज्य शासनाने केला. त्यामुळे त्या दुकानदारांनी ग्रामीण भागाकडे लक्ष केंद्रित केले. पण वेळीच सावध होत गावोगावच्या महिलांनी महाराष्ट्र दिनी आयोजित ग्रामसभेत दारूच्या हद्दपारीचा निर्धार केला.
दारूबंदीच्या चळवळीत सातारा जिल्हा कायमच अग्रेसर राहिला आहे. अनेक गावांमध्ये महिलांनी एकत्र येऊन मतदानाद्वारे बाटली आडवी केली. या चळवळीची राज्यभरात दखल घेतली गेली. त्यातून प्रेरणा घेऊन इतर जिल्ह्यातही दारूबंदीचा निर्धार करण्यात आला होता.
राज्य व राष्ट्रीय महामार्गावर दारूविक्रीस बंदीच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका सातारा जिल्ह्यातून गेलेल्या पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गालगतचे दारू, बिअर बार व परमिट रूमचालकांना बसला. त्यामुळे ते ग्रामीण भागाकडे मोर्चा वळविण्याची शक्यता आहे.
हे गृहीत धरून व्यसनमुक्त चळवळीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी १ मे महाराष्ट्र दिनी होणार असलेल्या ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव करण्याचे आवाहन केले होते. त्याला अनेक गावांमधून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. दारूबंदीचा ठराव केला. (प्रतिनिधी)
वाठार स्टेशन : महाराष्ट्र दिन, कामगार दिनानिमित्त घेतलेल्या देऊरच्या ग्रामसभेत गावातून दारू कायमची हद्दपार होण्याबाबतचा सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी कृषी मालास हमीभावाचा ठरावही संमत करण्यात आला.
देऊरला ‘नो दारू’चा ठराव
यावेळी गावच्या कायमस्वरुपी पाणीपुरवठा योजनेबाबत गावानजीक असलेल्या तळहिरा पाझर तलावातून नवीन योजना मंजूर करण्याबाबतच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. जिल्हा परिषद मराठी शाळेच्या मैदानाबाबत तसेच गावातील बंद पडलेल्या आणि दुरवस्था झालेल्या शासकीय विश्रामगृहाच्या दुरुस्तीबाबत पाठपुरावा करण्याबाबत चर्चा करण्यात आली. उपसरपंच बाळासाहेब कदम, प्रदीप कदम, राजेंद्र कदम यांनी मनोगत व्यक्त केले. ग्रामसेवक राहुल कदम यांनी आभार मानले.
दारूविरोधात वडूथला महिलांनी आवळली मूठ
शिवथर : सातारा तालुक्यातील वडूथ हद्दीत सर्व प्रकारच्या दारू विक्रीला कायमची बंदी करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव सोमवारच्या ग्रामसभेत करण्यात आला. यावेळी उपस्थित महिलांनी हात उंचावून ठराव मंजूर केला.
वडूथमध्ये अनेक वर्षांपासून शासनमान्य देशी दारूचे दुकान सुरू होते. त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. मात्र, दारू दुकान शासनमान्य असल्यामुळे कोणीच काही करत नव्हते. शासनाच्या नव्या नियमानुसार २२० मीटरच्या आत देशी-विदेशी दारू दुकान बंद करण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्र दिनाच्या ग्रामसभेत महिलांनी आक्रमक होऊन दारूबंदीचा ठराव आणला.