राष्ट्रवादी कार्यालयासमोरच महिलांची ‘फायटिंग’
By admin | Published: January 8, 2016 01:34 AM2016-01-08T01:34:44+5:302016-01-08T01:36:09+5:30
थप्पड की गुंज : उणी-दुणी काढत पदाधिकारी भररस्त्यात एकमेकींवर धावल्या; युवती सेलच्या कार्यकारिणीसाठी मुलाखतीनंतर प्रकार
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयासमोर गुरुवारी सायंकाळी महिला पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी झाल्याने खळबळ उडाली. हा ‘फाईट शो’ पाहणारे सगळेच अवाक् झाले होते. युवती सेलच्या कार्यकारिणी निवडीसाठी झालेल्या मुलाखतींनंतर हा राडा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
राष्ट्रवादी युवती सेलची बैठक गुरुवारी दुपारी पक्ष कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सेलच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा अर्चना घारे उपस्थित होत्या. जिल्हा मध्यवर्ती बँकेतून पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्यासोबत त्या राष्ट्रवादी कार्यालयात दाखल झाल्या. युवती सेलच्या नूतन पदाधिकारी निवडीसाठी त्यांनी मुलाखती घेतल्या. युवती सेलच्या पदाधिकारी निवडीसाठी मुलाखती झाल्या; मात्र पूर्वी पदे भूषविलेल्यांना पुन्हा संधी नाही, असे राज्य अध्यक्षा अर्चना घारे यांनी आधीच सांगितले होते. त्यामुळे काहीजणी अस्वस्थ झाल्या.
घारे व माने निघून गेल्यानंतर दोन महिला कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली आणि प्रकरण हातघाईवर आले. एकमेकांचे उट्टे काढणाऱ्या महिलांनी नंतर चक्क हाणामारीही केली. दोघींमधील वाद इतका वाढला की, वादाचे रूपांतर पुरुषांनाही लाजवेल अशा हाणामारीत झाले. उपस्थित महिला सदस्यांनी मध्यस्थी करून हाणामारी प्रकार थांबविला; मात्र दोघींनीही एकमेकांचा शेलक्या शब्दांत उद्धार केला.
गेल्या सहा महिन्यांपासून या दोन महिला पदाधिकाऱ्यांत वाद धुमसत होता, असे सूत्रांचे म्हणणे असून, या वादाला गुरुवारी वाट मिळाल्याचे सांगितले जात आहे. (प्रतिनिधी)
‘कांचन’ वृक्षामुळे ‘स्मित’हास्य लोपले
‘मी प्रचंड आशावादी’ असे गीत गाणाऱ्या राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांचे ‘स्मित’हास्य गुरुवारी जिल्हा युवती सेलच्या बैठकीनंतर अचानक लोपले आणि त्यांनी एकमेकींना ‘कांचन’वृक्षाचे काटे दाखवून दिले. ‘समुद्र’ही खवळला आणि एकमेकींची उणी-दुणी काढत त्या एकमेकींवर धावल्या. भररस्त्यात झालेल्या या मारामारीने येणाऱ्या-जाणाऱ्यांच्याच नव्हे तर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्याही भुवया उंचावल्या.
दोन महिलांचे मंगळसूत्रही तुटले !
मुलाखती झाल्यावर कार्यालयाबाहेर रस्त्यावरच एका माजी पदाधिकारी महिलेने युवतींना उद्देशून आक्षेपार्ह टिपण्णी केली. अशी व्यक्तिगत टिपण्णी करू नये यासाठी दोन महिला पदाधिकारी मैदानात उतरल्या. एका पदाधिकारी महिलेने आक्षेपार्ह टिपण्णी करणाऱ्या महिलेच्या श्रीमुखात भडकावली. त्यानंतर प्रचंड आरडाओरडा झाला. एकमेकींच्या अंगावर धावून जाणे, एकमेकींना मारण्याचा प्रयत्न करणे, इतर युवतींनी त्यांना मागे ओढणे असा हा राडा बराच वेळ चक्क रस्त्यावर सुरू होता. यावेळी झालेल्या झटापटीत दोन महिला पदाधिकाऱ्यांचे मंगळसूत्र तुटले.
पक्षाकडून गांभीर्याने दखल
हाणामारीच्या वृत्ताला जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी दुजोरा दिला असून, हा प्रकार निंदनीय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या घटनेची माहिती घेण्याचे काम सुरू केले असून, संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
माजी पालकमंत्र्यांच्या गाडीचा क्रमांक काय, असा तिरकस प्रश्न कांचन साळुंखेने मला विचारल्यामुळे वाद वाढला. मात्र, सुरुवात कांचननेच केली.
- स्मिता देशमुख, माजी अध्यक्ष, राष्ट्रवादी युवती सेल
समोरून जाणारी कार माजी पालकमंत्र्यांचीच का? एवढाच प्रश्न मी सहजपणे विचारला. मात्र, त्यामुळे स्मिता देशमुखांनी भांडण उकरून काढले.
- कांचन साळुंखे,
संचालिका, जिल्हा बँक सातारा.