महिलांची जीवन प्राधिकरणवर धडक
By Admin | Published: November 17, 2014 10:53 PM2014-11-17T22:53:12+5:302014-11-17T23:27:07+5:30
गृहलक्ष्मी भडकली : मतकर कॉलनीसह परिसरातील झोपडपट्टीत पाच महिन्यांपासून अपुरा पाणीपुरवठा
सातारा : येथील आयटीआय रोडवरील मतकर कॉलनीसह परिसरातील झोपडपट्टीत गेल्या चार-पाच महिन्यांपासून कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा होत आहे. यासंदर्भात वेळोवेळी तक्रार करून दखल न घेतल्याने संतप्त झालेल्या महिला आज (सोमवारी) येथील जीवन प्राधिकरणच्या कार्यालयात धडकल्या. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
मतकर कॉलनीतील महिलांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मतकर कॉलनीत गेल्या चार-पाच महिन्यांपासून पाणीपुरवठा अनियमित तसेच कमी दाबाने केला जात आहे. यासंदर्भात दि. ३० जून रोजी शाहूपुरी ग्रामपंचायत तसेच सरपंचांना पत्र पाठवून तेथील लोकांची गैरसोय दूर करण्याची मागणी केली होती. मात्र, समस्या न सुटल्याने दि. २ सप्टेंबरला दुसरे पत्र शाहूपुरी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांना दिले. मात्र, कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेलेली नाही.
मतकर कॉलनी व परिसरातील झोपडपट्टीतील रहिवाशांनी दि. २२ सप्टेंबरला आयटीआय रोडवर धरणे आंदोलन केले होते. त्यावेळी जीवन प्राधिकरण कार्यालयातील अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आठ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतरही आजतागायत या कॉलनीत व झोपडपट्टीत पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होतच आहे. ज्या दिवशी पाणी सोडले जाते, त्याची वेळ निश्चित नसते. त्यामुळे पाणी सोडल्याचे माहिती होण्यापूर्वी बंद झालेले असते. घरातील पुरुष मंडळी कामावर किंवा गृहिणी मुलांना शाळेत सोडण्यास जातात, त्याचवेळी पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे पाणी कधी आले, हे देखील लक्षात येत नाही. त्यामुळे अनेकांची गैरसोयच जास्त होत असल्याने पाणीपुरवठा करण्याची वेळ निश्चित करावी. या परिसरात नियमित व सुरळीत पाणीपुरवठा करण्यासंदर्भात योग्य ती उपाययोजना करावी, अन्यथा परिसरातील ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करतील, असाही इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. (प्रतिनिधी)
आठवड्यातील तीन दिवस ठणठणाट
या परिसरात सहा महिन्यांपासून पाणीपुरवठा विस्कळीत स्वरूपात होत असल्यामुळे ग्रामस्थांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत असतानाच या आठवड्यात कहरच झाला आहे. यामध्ये मंगळवार, दि. ११, बुधवार, दि. १२, शुक्रवार, दि. १४ या दिवसांत पाणीपुरवठाच झालेला नाही. त्यामुळे महिला संतप्त झाल्या आहेत. जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांकडे गाऱ्हाणी सांगण्यासाठी मोठ्या संख्येने महिला आल्या होत्या.