Satara: मिनी मंत्रालयात ‘नारीशक्ती’; महिला अधिकाऱ्यांकडून कार्याचा ठसा
By नितीन काळेल | Updated: March 7, 2025 19:38 IST2025-03-07T19:37:02+5:302025-03-07T19:38:25+5:30
सातारा : प्रशासनात महिला अधिकाऱ्यांचे प्रमाण वाढले असून सातारा जिल्हा परिषदेतही महिला राज आहे. कारण, एकूण १६ विभागापैकी सहा ...

Satara: मिनी मंत्रालयात ‘नारीशक्ती’; महिला अधिकाऱ्यांकडून कार्याचा ठसा
सातारा : प्रशासनात महिला अधिकाऱ्यांचे प्रमाण वाढले असून सातारा जिल्हा परिषदेतही महिला राज आहे. कारण, एकूण १६ विभागापैकी सहा ठिकाणी महिला अधिकारी आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी याशनी नागराजन कार्यरत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सुमारे ४० टक्के विभागांचा कारभार हा ‘नारीशक्ती’च्या हाती आला असून त्यांनी कार्याचा ठसाही उमटवलाय.
प्रशासनात पूर्वी पुरुष अधिकाऱ्यांची संख्या अधिक दिसत होती. पण, १० वर्षांपासून महिला अधिकारीही मोठ्या संख्येने प्रशासनात आल्या आहेत. केंद्रीय आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून त्या प्रशासनात येत आहेत तसेच जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, वन आदींसह विविध विभागांत कार्यरत राहून कर्तबगारीही गाजवत आहेत. अशाचप्रकारे सातारा जिल्ह्यातील विविध विभागांत आज महिला अधिकारी कार्यरत आहेत तर सातारा जिल्हाधिकारी कार्यालय असो किंवा पोलिस अधीक्षक कार्यालय येथील वरिष्ठ पदावर महिला अधिकारी विराजमान झाल्या होत्या.
मात्र, ६० वर्षांच्या इतिहासात सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी महिला अधिकाऱ्याची नियुक्ती झाली नव्हती. पण, राज्य शासनाने गेल्यावर्षी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदल्या केल्या. यामध्ये सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी याशनी नागराजन यांची नियुक्ती केली. त्यामुळे जिल्हा परिषदेत प्रथमच एक महिला मुख्य कार्यकारी अधिकारी झाली. त्यानंतर या मिनी मंत्रालयात ‘नारीशक्ती दिसून आली.
सातारा जिल्हा परिषदेत सध्या ६ महिला अधिकारी आहेत. यामध्ये ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी अर्चना वाघमळे आहेत. मागील तीन वर्षांहून अधिक काळ त्या विभागाचा कारभार पाहत आहेत. महिला व बालविकास विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी रोहिणी ढवळे यांची नियुक्ती झालेली आहे. त्याही मागील तीन वर्षांपासून कार्यरत आहेत. प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी शबनम मुजावर आहेत.
तर माध्यमिक शिक्षणाधिकारीपदी प्रभावती कोळेकर सुमारे तीन वर्षांपासून कार्यरत आहेत. यापूर्वीही त्या सातारा जिल्हा परिषदेतच प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारीपदी कार्यरत होत्या. त्याचबरोबर पाणी व स्वच्छता विभागाची धुरा उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा माने या पाहत आहेत. मागील वर्षापासून त्यांनी या विभागाचा पदभार स्वीकारलेला आहे. या सर्वच अधिकाऱ्यांनी आपल्या कामातून ठसा उमटवलाय हे विशेष.
तीन महिला अधिकारी साताऱ्यातीलच..
सातारा जिल्हा परिषदेतील ६ पैकी तीन महिला अधिकारी या साताऱ्याच्या आहेत. अर्चना वाघमळे या सातारा तालुक्यातील आहेत. प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी शबनम मुजावर या खटाव तालुक्यातील एनकूळ गावच्या आहेत. तसेच खटाव तालुक्यातीलच अंबवडे हे त्यांचे सासर आहे. महिला व बालविकास अधिकारी रोहिणी ढवळे यांचे सासर सातारा जिल्ह्यात आहे.