साताऱ्यात महिलांची 'सावित्री बाईक रॅली', सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजन
By सचिन काकडे | Published: January 3, 2023 06:59 PM2023-01-03T18:59:08+5:302023-01-03T18:59:51+5:30
स्वच्छतेचा आणि महिला सबलीकरणाचा देण्यात आला संदेश
सातारा : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९२ व्या जयंतीनिमित्त सातारा शहरात मंगळवारी सावित्री बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत एकूण ८० महिला दुचाकीस्वारांनी सहभाग नोंदविला. सातारा पालिकेच्या राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले.
साताऱ्यातील गांधी मैदान येथून या रॅलीला प्रारंभ झाला. ही रॅली खालच्या रस्ता, पोवई नाका, राजपथ रस्त्यावरून पुन्हा गांधी मैदान अशी नेण्यात आली. लेखाधिकारी आरती नांगरे यांनी सावित्री रॅलीला हिरवा झेंडा दाखविला. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने सुकन्या योजनेअंतर्गत पालिका शाळांमधील मुलींचे टपाल कार्यालयात खाते उघडण्यात आले. स्वच्छतेचा आणि महिला सबलीकरणाचा संदेश देणाऱ्या या रॅलीमध्ये अडीचशे महिला सहभागी झाल्या.
मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या मार्गदर्शनाखाली या रॅलीचे नियोजन करण्यात आले.
यावेळी आरोग्य निरीक्षक प्रकाश राठोड, सागर बडेकर, भांडार विभागाचे देविदास चव्हाण, बांधकाम अभियंता सुधीर चव्हाण याशिवाय सातारा शहरस्तर संघाच्या आशा मुळीक, सुवर्णा कडळ, कोमल माळी, उषा कुडाळकर, रूपाली गाढवे, मयूरी राजेशिर्के, भाग्यश्री पवार, स्वाती इंगवले, अर्चना जाधव यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. ही रॅली यशस्वी करण्यासाठी कीर्ती साळुंखे, गीतांजली यादव व आरती जोशी यांनी विशेष परिश्रम घेतले.