‘ब्लॅक डे’वर व्हॉट्सअॅपचा उतारा
By admin | Published: December 28, 2014 09:57 PM2014-12-28T21:57:10+5:302014-12-29T00:05:17+5:30
नव वर्षाभिनंदन : फुकट शुभेच्छा देण्याची संधी
सातारा : सरत्या वर्षाला निरोप देणारे किंवा येत्या वर्षाचे स्वागत करणारे, शुभेच्छा देणारे संदेश मित्र-मैत्रिणी, नातेवाइकांना न विसरता दिल्या जातात. या दोन दिवसांत मोठ्या संख्येने मेसेज पाठविले जातात. त्यामुळे अनेक मोबाईल कंपन्यांनी ३१ डिसेंबर व १ जानेवारी हे दोन दिवस ‘ब्लॅक दिवस’ म्हणून जाहीर केले आहेत. पण, सोशल मीडियावरून फुकटात मेसेज पाठविता येणार असल्याने ग्राहक मात्र निश्चिंत आहेत.
नातेवाईक, आपल्यावर प्रेम करणाऱ्यांना शुभेच्छा देण्याची पूर्वापार परंपरा आहे. अगदी दहा ते पंधरा वर्षांपूर्वी शुभेच्छापत्रांचा मोठा वापर केला जात होता. यासाठी सहा-सहा महिन्यांपूर्वीच शुभेच्छापत्रे तयार केली जात होती. अन् महिन्याभरापूर्वीपासून विक्रीस आलेले असत. त्यामुळे ते खरेदी करणे, पोस्टात टाकणे अन् ते नातेवाइकांपर्यंत वेळेत कसे पोहोचतील, याची काळजी घेतली जात होती.
बदलत्या जमान्यात दूरध्वनीचा शिरकाव झाला अन् फोन करून शुभेच्छा दिल्या जाऊ लागल्या; त्यानंतर मोबाईल आला. मोबाईलमुळे हातात जनसंपर्काचे प्रभावी माध्यम आले. मोबाईलवरून फोन करण्यापेक्षा एखादा सुंदर शुभसंदेश टाईप करून नातेवाईक, मित्र-मैत्रिणींना पाठविला जात होता.
गणपती, दसरा, दिवाळी, नववर्षारंभ या कालावधीत सर्व साधारणत: लाखो संदेश पाठविले जातात. हीच संधी इनकॅश करण्यासाठी मोबाईल कंपन्या हा दिवस ‘ब्लॅक दिवस’ म्हणून साजरा करतात. या दिवसात कोणतेही पॅकेज किंवा दरातील सवलती लागू केल्या जात नाहीत. तसेच या दिवसात पाठविलेल्या मोबाईल संदेशाचा दर एक रुपयापासून ते पाच रुपयांपर्यंत आकारला जातो. यासंदर्भात एक सूचनावजा मेसेज पाठविण्याचे सोपस्कार पाळले जातात; पण याकडे कोणाचेच लक्ष जात नाही अन् बिल आल्यावर झोप उडते.
यावेळीही मोबाईल कंपन्यांनी ‘ब्लॅक डे’चा संदेश पाठविला आहे. पण, याचा फारसा परिणाम ग्राहकांवर होईल, याची खात्री देता येत नाही. शुभसंदेशचे मेसेज पाठविण्यसाठी मेसेज पॅक घेण्याचेही प्रमाण कमी झाले असून बहुतांश तरुणाई सोशल मीडियाकडे वळाली आहे. (प्रतिनिधी)
असंख्य अॅप्स् सेवेला
हजारो तरुणांच्या हातात स्मार्ट फोन आले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे इंटरनेट आले आहे. ‘गुगल प्ले’वर असंख्य अॅप्लिकेशनन ग्राहकांच्या सेवेत आहेत. यामध्ये स्वत:ला हवे ते छायाचित्र, हवा तो संदेश विविध प्रकारांत टाईप करून स्वत:च्या कल्पकतेतून शुभसंदेश बनविता येतो. हे संदेश व्हॉट्सअॅप, फेसबुक, ब्लूटूथवरून मोफत पाठविता येणार आहे. संदेश पाठविण्यास जादा दर आकारला जाणार असला तरी सोशल मीडियावर फुकटात पाठविता येणार आहेत.