दिला शब्द नेत्यांनी; अर्ज घेतला माघारी !
By admin | Published: July 23, 2015 09:41 PM2015-07-23T21:41:24+5:302015-07-24T00:39:55+5:30
ग्रामपंचायत निवडणूक : नाराज उमेदवारांच्या भूमिकेकडे लक्ष
सातारा : जिल्ह्यातील ७११ सार्वत्रिक व १५ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. अनेक गावांमध्ये गटातटाचे राजकारण मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. इच्छुकांची संख्या वाढल्याने नेत्यांचीही डोकेदुखी वाढली; परंतु नेत्यांचा शब्द पाळून अनेकांनी या निवडणुकीच्या रणांगणातून माघार घेतली असली तरी त्यांच्या मनातील नाराजी मात्र तसीच राहणार आहे. त्यामुळे रणांगणातून परत आलेले उमेदवार काय भूमिका घेणार, हेही या निवडणुकीतील महत्त्वाचे सत्ताकेंद्र ठरणार आहे.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक गावात गटातटाचे राजकारण मोठ्या प्रमाणावर असते. काही ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीअंतर्गतचे गट एकमेकांसमोर उभे ठाकल्याने नेतेमंडळींनी स्थानिक कार्यकर्त्यांना समज देत आहेत. दोघांच्या वादात ग्रामपंचायत हातातून निसटेल, असा इशाराही दिला जात आहे. गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुकांना थोपविण्यासाठी नेतेमंडळी साम, दाम, दंड नीतीचा वापर करत आहेत. अशा इच्छुकांनी अर्ज माघारी घेतले तरी त्यांची नाराजी कायम आहे. त्यामुळे नाराज असलेला गट आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्याला कधीही धोका देऊ शकतो, अशी परिस्थिती अनेक ठिकाणी पाहायला मिळणार आहे. गावागावांत रात्री उशिरापर्यंत हालचाली सुरू झाल्या आहेत. बहुतांश गावांत राष्ट्रवादीविरोधात काँगे्रसचे गट एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. शिवसेनेनेही ‘करो या मरो’ ची भूमिका घेतली आहे. भाजपकडूनही मोर्चेबांधणी सुरू आहे.
माण तालुक्यामध्ये आमदार जयकुमार गोरे, त्यांचे बंधू पंचायत समिती सदस्य शेखर गोरे, माजी आमदार सदाशिव पोळ यांचे गट आक्रमक झाले आहेत. दहिवडी, गोंदवले बु., गोंदवले खु., पिंगळी या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
पाटण तालुक्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे मूळगाव असणाऱ्या कुंभारगावातील सत्ता हाणून पाडण्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई, जिल्हा बँकेचे माजी संचालक भगवानराव पाटील यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
आ. शंभूराज देसाई यांच्या गटाचे डॉ. दिलीप चव्हाण यांनीही तयारी सुरू केली आहे. चिखलेवाडी, जानुगडेवाडी या ग्रामपंचायतींमध्येही मोठी टस्सल होणार आहे. पाटणकर गट अद्यापही सक्रिय नसला तरी आ. शंभूराज देसाई गटाने सत्ता टिकविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
जावळीत कुडाळ, रायगाव, बामणोली तर्फ कुडाळ, महिगाव, सायगाव, हुमगाव, दरे खुर्द, वरोशी, करंदी तर्फ कुडाळ, खर्शी या गावांत राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, मोहन शिंदे, जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार, सुहास गिरी, निर्मला कासुर्डे, संगीता चव्हाण यांचे गट आक्रमक झाले आहेत.
फलटणमध्ये कोळकी, निंबोरे, साखरवाडी या प्रमुख ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांचे गट साखरवाडीत समोरासमोर असणार आहेत.
खटावमध्ये पुसेगाव, पुसेसावळी, सिद्धेश्वर कुरोली, कातरखटाव या निवडणुकांकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. चंद्रकांत पाटील, आमदार जयकुमार गोरे, शिवसेनेचे रणजित देशमुख यांचे गट वेगाने कामाला लागले आहेत.
खंडाळा तालुक्यात विंग, सांगवी, खंडाळा, भादे, कणेरी या राजकीयदृष्ट्या संवेदनशील ग्रामपंचायतींसाठी राजकीय आखाडा तापला आहे. आमदार मकरंद पाटील, शिवसेनेच्या शारदा जाधव, हणमंतराव साळुंखे, आनंदराव गायकवाड, राजेंद्र नेवसे, बंटी महांगरे, साहेबराव महांगरे यांचे गट वेगाने कामाला लागले
आहेत. वाईमध्ये बावधन, पसरणी, उडतारे, बोपेगाव, शिरगाव, अभेपुरी या गावांत सध्या जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. (प्रतिनिधी)
तुमच्या वादात आम्ही पडणार नाही!
सातारा तालुक्यातील एका गावातील दोन्ही गटांची मंडळी नेत्यांकडे जाऊन बसली होती. पॅनेलचे नेतृत्व करण्याची विनंती दोन्ही गटांकडून करण्यात आली; पण जो निवडून येईल तो आमचा, असे सूत्र संबंधित नेत्याने दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांसमोर स्पष्ट केले.