विसापुरात २२५ हेक्टरवर काम पूर्ण...
By admin | Published: January 3, 2016 11:26 PM2016-01-03T23:26:06+5:302016-01-04T00:33:01+5:30
जितेंद्र शिंदे : पाण्याबाबत गाव लवकरच स्वयंपूर्ण होणार
पुसेगाव : ‘विसापूर ग्रामस्थांनी लोकसहभाग व शासनाने उपलब्ध करून दिलेल्या पोकलेन मशीनद्वारे सुमारे २२५ हेक्टर क्षेत्रावर डीप सीसीटीचे काम पूर्ण केले. या कामामुळे पावसाचे पाणी जमिनीत अडविले जाणार असून, भूगर्भातील पाणी पातळीत चांगलीच वाढ होणार आहे. विसापूर हे लवकरच पाण्यामध्ये स्वयंपूर्ण होईल,’ असा विश्वास जिल्हा कृषी अधिक्षक जितेंद्र शिंदे यांनी व्यक्त केला.
विसापूर, ता. खटाव येथे नादुरुस्त असलेल्या दगडी सिमेंट बंधारे व डीप सीसीटी पाहणीदरम्यान ते बोलत होते. उपविभागीय कृषी अधिकारी विठ्ठलराव भुजबळ, तालुका कृषी अधिकारी अरुण जाधव, कोरेगाव तालुका कृषी अधिकारी सुनील साळुंखे, सरपंच सागर साळुंखे, उपसरपंच शोभा शिंदे, सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र साळुंखे, रेवलकरवाडीचे उपसरपंच आनंदराव बिटले, ग्रामविकास अधिकारी एस. एस. पवार, मंडल कृषी अधिकारी हेमंत भोंगळे, आर. एन. देशमुख, एस. के. पाटणे, एस. के. जगदाळे, एन. टी. कोळेकर, के. व्ही काळे, टी. एम. सूळ, एच. बी. भोसले, सयाजी सावंत, सुहास साळुंखे, संतोष साळुंखे, नीलेश साळुंखे उपस्थित होते.
कृषी अधीक्षक शिंदे म्हणाले, ‘विसापूर पंचक्रोशीला तिन्ही बाजूने डोंगर, दोन मोठे ओेढे व पोटनाले ही फार मोठी नैसर्गिक संपत्ती लाभलेली आहे. विसापूरचा ‘जलयुक्त शिवार’ अभियानामध्ये समावश आहे. या अभियानाच्या माध्यमातून विसापूर ग्रामस्थांनी अत्यंत नियोजनबद्ध पायथा ते माथा दिशेने डीप सीसीटीचे काम सुरू केले आहे. डीप सीसीटीमुळे पावसाच्या पाण्याचा गढूळ पूर येण्याच्या ऐवजी ते पाणी जमिनीत मुरले जाईल. त्यानंतरच स्वच्छ पाण्याचा ओढ्यांना पूर येईल. जमिनीची होणारी धूपही पूर्णत: थांबेल. काढलेल्या डीप सीसीटीच्या मातीबांधावरती सीताफळ, आवळा फळबाग लागवड करावी. त्यासाठी अनुदान दिले जाईल.’ (वार्ताहर)