काम चालू; गल्ला बंद.. घरपोच सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:48 AM2018-04-24T00:48:45+5:302018-04-24T00:48:45+5:30
सचिन काकडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : पोवई नाक्यावर सुरू असलेले ग्रेड सेपरेटरचे काम तसेच वाहतूक व्यवस्थेत केलेल्या बदलाचा लहान-मोठ्या सुमारे चारशे व्यावसायिकांना फटका बसला आहे. ग्राहकांनीही खरेदीकडे पाठ फिरवल्याने किरकोळ विक्रेत्यांवर स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. असे असले तरी काही व्यावसायिकांनी या समस्येवर तोडगा शोधून काढला आहे. ग्राहकांना हव्या असणाऱ्या वस्तूंची मोबाईल सेवेद्वारे थेट घरपोच सेवा दिली जात आहे.
वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी पोवई नाक्यावर गेल्या महिनाभरापासून ग्रेड सेपरेटरचे काम सुरू करण्यात आले आहे. कामाला प्रत्यक्ष प्रारंभ होताच पोवईनाक्यावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. ही कोंडी टाळण्यासाठी काही दिवसांपूर्वी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला. याचा फटका फळ विक्रेते, टपरीधारकांसह व्यापाºयांना बसला आहे.
खरेदीसाठी ग्राहकच येत नसल्याने रस्त्याकडेला बसून चप्पल शिवणारे, चावी बनविणारे तसेच फळविक्री करणारे विक्रेते हतबल झाले आहेत. कपडे व्यावसायिंक, हॉटेल चालक तसेच इलेक्ट्रिक साहित्याची विक्री करणाºयांनाही याच परिस्थितीतून जावे लागत आहे. नाक्यावरील जवळपास चारशे व्यावसायिकांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.
एकीकडे ग्राहकांविना काही व्यावसायिक हतबल झाले असताना दुसरीकडे मात्र काहींनी या समस्येवर तोडगा शोधून काढला आहे.ग्राहकांना हव्या असणाºया वस्तूंची थेट घरपोच सेवा दिली जात आहे. यासाठी संबंधित व्यावसायिकांनी मोबाईल सेवा सुरू केली असून, ग्राहकांचा फोन येताच मागणीनुसार वस्तू पुरविल्या जात आहे. यामुळे ग्राहकांमधूनही व्यावसायिकांच्या अनोख्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
पन्नासवरून दहा डझनावर...
मुन्ना मुलाणी हे गेल्या पंचवीस वर्षांपासून पोवई नाक्यावर फळविक्रीचा व्यवसाय करीत आहेत. ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे रस्ते बंद झाल्याने ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरविली आहे. पूर्वी ५० डझन केळींची विक्री व्हायची आता दिवसभरात दहा डझनही केळी विकली जात नाहीत. आता स्थलांतर करायचं म्हटलं तर जायचं कुठं? हाच मोठा प्रश्न आहे. दिवसभरात भांडवलाचा खर्चही सुटत नाही.