सातारा शहरामध्ये दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत येणारी कामे रखडली
By admin | Published: January 29, 2016 12:17 AM2016-01-29T00:17:51+5:302016-01-29T00:27:24+5:30
सुमारे साडेतीन कोटींची कामे मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिली होती
सातारा : सातारा शहरामध्ये दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत येणारी कामे रखडली आहेत. पालिकेने सुमारे साडेतीन कोटींची कामे मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिली होती. पालकमंत्र्यांनीही याबाबत काहीच निर्णय घेतला नसल्याने ही कामे रखडली आहेत.
प्रभाग ७ मध्ये गुरुवार बीफ मार्केट पूल ते हिराभाऊ वायदंडे धट्टी येथे संरक्षक भिंत, सांस्कृतिक हॉल व व्यायाम शाळा बांधणे, कामाठीपुरा येथे संरक्षक भिंत, पोलीस करमणूक केंद्र ते पोलीस क्लब रस्ता, राधिका रस्ता ते कुमार तपासे घर रस्ता, मंगळवार पेठेत संत कबीर सोसायटीमधील रस्ता, बनसोडे वस्तीत संरक्षक भिंत, गुरुवार पेठ ओढ्याला कॅनॉलिंग, चिमणपुरा पेठेत डांबरीकरण, मंगळवार पेठेत ओढ्याचे काम, सदर बझार मिलिंद हौसिंग सोसायटीत सभागृह, भोई गल्ली समाज मंदिरात ते खारी
विहीर रस्ता, सर्वोदय कॉलनीतील रस्ता, केसरकर पेठेतील सहजीवन सोसायटीतील रस्ता, शनिवार पेठ व रामाचा गोट येथील घरकुलांसाठी कुंपण भिंत, मंगळवार पेठेतील पोळ वस्ती संरक्षक भिंत, मंगळवार पेठ दत्त मंदिर ते पोळ वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर स्ट्रिटलाईट आदी कामे रखडली आहेत. नगरपालिकेने याबाबतचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तो धूळखात पडल्याने या भागातील कामे रखडली आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही कामे पूर्ण करण्यासाठी पालिका पदाधिकाऱ्यांची धावपळ उडाली आहे. त्यातच कामे होत नसल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे. पालकमंत्री व जिल्हाधिकारी या दोघांच्या आदेशाने ही कामे मार्गी लागणार असल्याने त्यांनी याबाबत पुढाकार घ्यावा, अशी मागणी नागरिक करत आहेत. (प्रतिनिधी)