जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे काम राज्याला दिशादर्शक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:41 AM2021-05-08T04:41:08+5:302021-05-08T04:41:08+5:30
रहिमतपूर : ‘संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात सापडलेले असून, त्याचा परिणाम सर्व क्षेत्रांमध्ये झालेला आहे. कोरोनाच्या खडतर काळामध्ये सातारा जिल्ह्याच्या ...
रहिमतपूर : ‘संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात सापडलेले असून, त्याचा परिणाम सर्व क्षेत्रांमध्ये झालेला आहे. कोरोनाच्या खडतर काळामध्ये सातारा जिल्ह्याच्या शिक्षण विभागातील अधिकारी, पदाधिकारी व सर्व शिक्षकांनी नवी उभारी घेऊन केलेले शैक्षणिक कामकाज राज्याला दिशादर्शक ठरले आहे,’ असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या शिक्षण व क्रीडा समितीचे तज्ज्ञ सदस्य रूपेश जाधव यांनी केले.
शिक्षण कमिटीच्या मासिक सभेमध्ये ते बोलत होते. रूपेश जाधव म्हणाले, ‘सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले व मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या प्रेरणेने जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे यांच्या मार्गदर्शनाने व प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर व फलटणच्या शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य ज्योती मेटे, उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे व धनंजय चोपडे व सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यातील शिक्षकांना नवी उभारी मिळाली आहे.’
दर शनिवारी गोष्टीचा शनिवार हा अनोखा उपक्रम डायट संस्थेच्या मदतीने स्वतः शिक्षकांनी तयार केलेली कृतिपत्रिका यांची निर्मिती व वितरण हा राज्यातील एकमेव उपक्रम असून, तो सर्वांसाठी दिशादर्शक ठरला आहे. दर महिन्याला शिक्षकांसाठी शिक्षण परिषदेचे केलेले आयोजन, तसेच संपूर्ण देशासाठी लागू करण्यात आलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे ऑनलाइन प्रशिक्षण, गेले वर्षभर कोरोना काळातही सर्व शाळांच्या पार पडलेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या सभा या सर्वामुळे विद्यार्थी शिक्षण प्रवाहामध्ये राहण्यास खूपच फायदा झाला. राज्य शासनाच्या वतीने राज्यातील पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना सोडविण्यासाठी वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश असणाऱ्या व्हाॅट्सॲप स्वाध्याय निर्माण करण्यात आला आहे. शासनाच्या या उपक्रमांमध्येही सातारा जिल्ह्यातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांनी खूपच सक्रिय सहभाग नोंदवला आहे. सहभाग नोंदविलेल्या विद्यार्थ्यांमध्ये आपला जिल्हा नेहमीच पहिल्या तीन क्रमांकांमध्ये राहिला असून, काही स्वाध्यायमध्ये तर सातारा जिल्ह्याला प्रथम क्रमांकाचे पारितोषिकही मिळाले असल्याचे रूपेश जाधव यांनी सांगितले.