गंगापुरी-शेलारवाडी पुलाचे काम दीड वर्षापासून संथगतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:27 AM2021-07-16T04:27:02+5:302021-07-16T04:27:02+5:30
वाई : धोम डाव्या कालव्यावरील गंगापुरी-शेलारवाडी रस्त्यावरील पूल पडून दीड वर्ष उलटले. या पुलाच्या पूर्णत्वास धोम पाटबंधारे ...
वाई : धोम डाव्या कालव्यावरील गंगापुरी-शेलारवाडी रस्त्यावरील पूल पडून दीड वर्ष उलटले. या पुलाच्या पूर्णत्वास धोम पाटबंधारे व संबंधित ठेकेदाराला मुहूर्त सापडत नाही. हा रस्ता गंगापुरी-एमआयडीसी जोडणारा असल्यामुळे महत्त्वाचा आहे. एमआयडीसी, शेलारवाडी व गंगापुरी येथील नागरिक, कामगार व शेतकऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
अनेकवेळा पाठपुरावा करूनही काम गती घेईना म्हणून गंगापुरी, वाई येथील नगरसेवक प्रदीप चोरगे यांनी पुढाकार घेऊन साधारण दीड लाख खर्च करून पंधरा दिवसांत स्वखर्चाने पर्यायी छोटा पूल तयार करून पन्नास मीटर रस्त्यावर मुरूम टाकून दुरुस्ती केली. स्वतःच उद्घाटन केले. तरी अपूर्ण पुलाची कामे तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी जनतेतून केली जात आहे.
संबंधित ठेकेदाराकडून पुलाच्या कामांना काही केल्या कसलीही गती मिळत नाही. त्यामुळे अत्यंत रहदारीच्या व वर्दळीच्या मार्गावरील पुलांचे काम गेल्या दीड वर्षापासून रखडले आहे. धोम पाटबंधारे विभाग याची गांभीर्याने दखल घेत नाही.
वाई एमआयडीसी शेलारवाडी येथील पूल धोकादायक कारणास्तव दीड वर्षापूर्वी पाडण्यात आला. त्या पुलाला किती वर्षे लागणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नागरिकांना अनेक किलोमीटरचा वळसा घालून रविवारपेठ मार्गे मांढरदेव रोडने जावे लागत असल्याने मानसिक त्रास होऊन वेळ व आर्थिक भुर्दंड बसत आहे. एमआयडीसी शेलारवाडी पुलाची अवस्था 'असून अडचण, नसून खोळंबा' अशी झाली आहे. या पुलावरून परिसरातील दररोज शेकडो कामगार वाई एमआयडीसीमध्ये कामासाठी ये-जा करतात, तर परिसरातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या कामासाठी अवजारे घेऊन ने-आण करावी लागते. पुलाचे काम सुरू करतेवेळी दुचाकी वाहने जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करून देण्याचा दिलेला शब्दही पाळण्यात आलेला नसल्याने किमान दुचाकी व नागरिकांना जाता येईल असा पूल तयार करण्यात आल्याने नागरिकांची मोठी गैरसोय दूर झाल्याने समाधान व्यक्त केले.
कोट..
गंगापुरी-शेलारवाडीला जोडणारा रस्ता हा रहदारीस मुख्य रस्ता असून, दीड वर्षापूर्वी धोकादायक म्हणून पाडण्यात आला आहे. पूल मंजूर होऊनही कामात गती नसल्याने काम अपूर्ण आहे. पूल अपूर्ण असल्यामुळे वळसा घालून यावे लागत असल्यामुळे वेळ जाऊन आर्थिक भुर्दंड बसत आहे. यामुळे अखेर स्वखर्चाने पर्यायी पूल तयार केला आहे. तरी लवकर काम पूर्ण करावे.
-प्रदीप चोरगे, नगरसेवक