वर्क फ्रॉम होम २
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:43 AM2021-09-21T04:43:17+5:302021-09-21T04:43:17+5:30
कोरोना रुग्णसंख्या कमी होऊ लागले तसतसे निर्बंध आणखी शिथिल होऊ लागले. तरीही आयटी कंपन्यांचे वर्क फ्रॉम होम मात्र काही ...
कोरोना रुग्णसंख्या कमी होऊ लागले तसतसे निर्बंध आणखी शिथिल होऊ लागले. तरीही आयटी कंपन्यांचे वर्क फ्रॉम होम मात्र काही संपली नाही. याचे कारणही तसेच होते. नवी कार्यपद्धती कर्मचाऱ्यांपेक्षा आयटी कंपन्यांचे व्यवस्थापन आणि एच. आर. अधिकाऱ्यांना सर्वाधिक आवडली. त्याला कारणही तसेच होते. या नव्या कामामुळे कंपन्यांच्या दरवर्षी खर्च होणाऱ्या लाखो रुपयांची बचत लागली. यातूनच या कंपन्यांनी ‘वर्क फ्रॉम होम’ला जोड दिली ‘वर्क फ्रॉम एनिवेअर.’
आयटी क्षेत्राची स्वतःची अशी संस्कृती आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांना घरातून कंपनीत घेऊन जाण्यासाठी आणि पुन्हा घरी सोडण्यासाठी स्वतंत्र वाहनाची व्यवस्था केली जाते. यावर वाहने, चालकाचे वेतन, गाड्यांची देखभाल यावर दर महिन्याला लाखो रुपये खर्च होतो. काही कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांसाठी चहा, नाश्ता, जेवण विनामूल्य पुरवले जाते. तो खर्च वाचला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कर्मचाऱ्यांची कार्यालयातील कामाची वेळ नियमानुसार आठ तास असते तरी ते प्रत्यक्षात पाच ते सहा तासच काम करतात. मात्र, यासाठी शेकडो संगणक, लॅपटॉप, वातानुकूलित यंत्रणा दिवसभर सुरू असते. यासाठी विजेवर होणारा खर्च हा लाखो रुपयांच्या घरात असतो. त्यांचीही बचत मोठ्या प्रमाणावर होऊ लागली. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी शहरात नाही आले तरी चालेल. कोठूनही काम केले तरी चालेल, अशी सूट दिली.
घरी बसूनच काम करून लाखो रुपयांचे पॅकेज असणारी नोकरीही मिळाली, याचा आनंद कुटुंबीयांना आहे. मात्र घरचेच खाऊन, बारा-बारा तास काम करावे लागते. कुटुंबीयांपासून लांब असल्यामुळे मौजमजा करायला मिळायची तीही बंद झाली. त्यामुळे पहिल्यासारखे काम कधी सुरू होते. याकडे या तरुणांचे लक्ष लागून राहिले आहे.
कोट
‘वर्क फ्रॉम होम’ आणि आता ‘वर्क फ्रॉर्म एनिवेअर’ यामुळे गावाकडे राहता येईल. आई-वडिलांना पुरेसा वेळ देता येईल. शेताची राहिलेली कामे करता येतील, असे वाटत होते. मात्र, या ठिकाणी अपुऱ्या सुविधांमुळे कामांचा वेग कमी झाला. एका ठिकाणी बारा-बारा तास बसूनही कामाचा निपटारा होत नाही. यामुळे आगीतून फुफाट्यात पडलो की काय, असे वाटू लागले आहे. ठरवलेले कोणतेच काम होत नाही, त्यामुळे पुन्हा प्रत्यक्षात काम कधी सुरू होईल याकडे आमचे लक्ष लागले आहे. आमचा व्यवस्थापनाशी सातत्याने संपर्क चालू असतो, असे मत या क्षेत्रात काम करणारे अनेक तरुण व्यक्त करतात.