वर्क फ्रॉम होम ३

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:43 AM2021-09-21T04:43:19+5:302021-09-21T04:43:19+5:30

घरच्या घरी फर्निचर निर्मिती ‘वर्क फ्रॉम होम’ ही संकल्पना खासगी कंपन्या, आयटी क्षेत्र शाळा-महाविद्यालयांसाठी प्रचलित झाली असली तरी या ...

Work from home 3 | वर्क फ्रॉम होम ३

वर्क फ्रॉम होम ३

Next

घरच्या घरी फर्निचर निर्मिती

‘वर्क फ्रॉम होम’ ही संकल्पना खासगी कंपन्या, आयटी क्षेत्र शाळा-महाविद्यालयांसाठी प्रचलित झाली असली तरी या काळात कडकडीत बंद होता. बाहेर पडण्यावर निर्बंध असल्याने असंख्य सातारकर घरातच बसून होते. घरात बसून वेळ जात नव्हता. त्यामुळे करायचे काय, हा प्रश्न सर्वांसमोर होता. बहुतांश जणांनी घरात बसून टीव्ही पाहून, पत्ते खेळून तर काहींनी छंद जोपासून वेळ घालवला. तर, काहींनी आजवर कधीच केले नाही अशा वेगळ्या कामात स्वतःला गुंतवून नवनिर्मितीचा आनंद घेतला. त्यापैकीच एक म्हणजे साताऱ्यातील सदरबजार परिसरात राहणारे गोविंद भरमगुंडे. त्यांनी एकट्याने फर्निचरची दोन मोठी कपाटे, टेरेसवर बाग फुलवली. त्यासाठी टाकाऊ टायरचा वापर केला.

लॉकडाऊन काळात घरात बसून वेळ जात नसल्याने भरमगुंडे यांनी काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय घेतला. अनेक वर्षांपासून रखडलेले फर्निचर स्वतःच बनविण्याचे ठरवले. प्लायवूड विकणाऱ्या एका दुकानात ते गेले. तेथे साधारणत: चार बाय दहाची दोन कपाटे करायची आहेत, किती प्लायवूड लागेल असे विचारले. तेव्हा दुकानदार म्हणाला, ‘मिस्त्री मापं घेऊन सांगेल. कोण करणार आहे.’ ‘तेव्हा मीच करणार आहे’, असे भरमगुंडे यांनी सांगितले. तेव्हा त्या विक्रेत्याने पायापासून डोक्यापर्यंत पाहिले आणि म्हणाला, ‘चेष्टा करताय का साहेब.’ तेव्हा मी करणार आहे; पण किती लागेल तेवढे दे. फक्त घरात पोहोच करण्याची विनंती केली. प्लायवूड घरी आणून पडले. पण त्यासाठी काय काय अवजारे लागणार हे कुठे माहीत होते. पुन्हा एका दुकानात जाऊन अमुक करायचे आहे ‘करवत’ आहे का विचारले. तेव्हा पुन्हा कोण करणार आहे. त्याच्याकडे करवत कशाला मशीनच असत्यात. तुम्ही कशाला घेता, असा सल्ला फुकटात मिळाला. पण ‘मीच करणार आहे. त्याचे पैसेही देणार आहे. मात्र, जर वापरता आले नाही तर किमान निम्म्या किमतीला घ्यावे लागेल’, अशी बोली केली. सर्व साहित्य घरी आणले. त्यानंं मशीन कशी चालवायची हे दाखविले होते. त्याप्रमाणे कामाचा श्रीगणेशा केला. सर्वप्रथम चार फुटाचा तुकडा पाडला. मात्र, मशीनची रुंदी आणि पातं यातील अंतर लक्षात न आल्यानं माप चुकलं. पण हळूहळू चुकत चुकत पण शिकत गेलो. अन् काही दिवसांत त्यांनी दोन कपाटं तयार केली. काम करताना जसजशी अडचणी येत गेली तसतसे आवश्यकतेनुसार पटारी, ड्रील मशीन, हातोडा आणला.

चौकट

सनमाईकला इंजेक्शन

सर्वांत अवघड काम वाटले ते सनमाईक लावणे. सनमाईक लावल्यानंतर त्याला योग्य तो दाब न मिळाल्याने तो फुगला. मग त्याला छिद्र पाडून इंजेक्शनद्वारे प्लायवूड आणि सनमाईकच्या मध्ये फेव्हिकॉल टाकला. हातानेच दाब दिला. नानाविध प्रयोग करून त्यांनी दोन कपाटं तयार केली. पण त्यातून जो काही आनंद मिळाला तो वेगळाच होता, असे गोविंद भरमगुंडे आठवणीने सांगतात.

Web Title: Work from home 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.