वर्क फ्रॉम होम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:43 AM2021-09-21T04:43:14+5:302021-09-21T04:43:14+5:30
- जगदीश कोष्टी, उपसंपादक, सातारा. कोरोनाचा शिरकाव झाला आणि त्यानंतर काही नवीन शब्द सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात, दैनंदिन जीवनामध्ये सातत्याने ...
- जगदीश कोष्टी,
उपसंपादक, सातारा.
कोरोनाचा शिरकाव झाला आणि त्यानंतर काही नवीन शब्द सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात, दैनंदिन जीवनामध्ये सातत्याने वापरले जाऊ लागले. लॉकडाऊन, संस्थात्मक विलगीकरण, गृहविलगीकरण, अँटिजन चाचणी, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिमीटर, थर्मामीटर. याबरोबरच आणखीन एक महत्त्वाचा शब्द म्हणजेच ‘वर्क फ्रॉम होम’.
कोरोनाचा संसर्ग हा प्रामुख्याने बाधित रुग्णाच्या निकट संपर्कात आल्यामुळे होतो. हे लक्षात आल्यानंतर केंद्र आणि राज्य शासनाने लोकांनी गर्दी करू नये म्हणून एकत्र येण्यावर निर्बंध लावले. त्याप्रमाणे मंदिर, शासकीय निमशासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा सर्वाधिक फटका खासगी क्षेत्राला झाला. औद्योगिक वसाहतीमधील कंपन्या, पुणे, बंगलोर, मुंबई, अहमदाबाद आदी ठिकाणी कार्यरत असणाऱ्या देश-विदेशातील आयटी कंपन्या, कार्पोरेट क्षेत्राला मोठी झळ बसली.
सातारा जिल्ह्यातील असंख्य तरुण नोकरीच्या निमित्ताने पुणे, मुंबई, बंगलोर, अहमदाबाद आदी ठिकाणी एकटे-दुकटे राहत आहेत. लॉकडाऊनमध्ये हॉटेल्स, खानावळी बंद होत्या. यामुळे तरुणांची उपासमार होऊ लागली. त्यातच कामही बंद असल्याने विनाकारण घरभाडे व इतर गोष्टींवर खर्च वाढू लागला. तसेच घराबाहेर कोरोना विषाणूचा धोका अधिक असल्याने या काळात आपल्या रक्ताच्या माणसांमध्ये जाण्याची भावना प्रत्येक माणसांमध्ये निर्माण झाली होती. त्यामुळे या तरुण-तरुणींनी आपापल्या गावी जाणे पसंत केले. कालांतराने कंपन्या मर्यादित कर्मचाऱ्यांमध्ये सुरू झाल्या; मात्र साताऱ्यातील अनेक कुटुंबांनी मुंबईतील रुग्णसंख्येचा विचार करून मुंबईत जाऊन मरण्यापेक्षा नोकरी गेली तरी चालेल; पण मुलांना न पाठवण्याचा निर्णय घेतला. कंपन्या सुरू करूनही कर्मचाऱ्यांमधून मिळालेला अल्प प्रतिसाद पाहून खासगी कंपन्यांनी ‘वर्क फ्रॉर्म होम’चा अवलंब केला.
या कार्यप्रणालीत दररोज सकाळी ऑनलाइन पद्धतीने मिटिंग होऊ लागली. त्यामध्ये कामाचे नियोजन होऊ लागले. काही ठिकाणी फिक्स काम असलेल्या ठिकाणी त्यांना मेल येऊ लागले. काम घरात बसून करण्यास कंपन्यांनी परवानगी दिल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. असंख्य मंडळींनी लागलीच स्वखर्चातून लॅपटॉप, अत्याधुनिक मोबाईल, कॅमेरे खरेदी केले. कामास प्रत्यक्षात सुरुवात केल्यानंतर यामध्ये अनेक अडचणी जाणवू लागल्या. कार्यालयांमध्ये वाय-फाय, ब्रॉडबँड असते. त्यामुळे काम करणे सहज सोपे जाते. ग्रामीण भागात ही सुविधा कुठेही नसल्याने त्यानंतर यंत्रणेतील जुळवाजुळव सुरू झाली. त्यामुळे इंटरनेटचे कनेक्शन, नेट कनेक्शनसाठी डोंगल, मोबाईल कनेक्टिव्हिटी, वेब कॅमेरे, हेडफोन्स यांना मोठी मागणी वाढली.