'शहापूर'ने भागविली तहान; आता 'कास' व्हावे गतिमान..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2021 03:49 PM2021-12-16T15:49:18+5:302021-12-16T15:50:04+5:30
गेल्या दीड दशकांपासून शहापूर योजना सातारकरांची तहान भागवत आहे. मात्र, या योजनेचे वीजबिल व देखभाल दुरुस्तीवर वर्षाकाठी सुमारे २ कोटी रुपये खर्च येत आहे, तर दुसरीकडे कास योजनेचा खर्च केवळ ३० लाख इतका आहे.
सचिन काकडे
सातारा : गेल्या दीड दशकांपासून शहापूर योजना सातारकरांची तहान भागवत आहे. मात्र, या योजनेचे वीजबिल व देखभाल दुरुस्तीवर वर्षाकाठी सुमारे २ कोटी रुपये खर्च येत आहे, तर दुसरीकडे कास योजनेचा खर्च केवळ ३० लाख इतका आहे. शहापूर योजना लाभदायी असली तरी तिचा खर्च अमाप आहे. यामुळे शहापूरचा हत्ती पोसण्याऐवजी कास योजनेचे काम गतीने मार्गी लागणे गरजेचे आहे.
सातारा शहराला कास व शहापूर योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. शहराचा वाढता विस्तार पाहता कास योजनेला शहापूर योजनेची जोड देण्यात आली. उरमोडी धरणावर साकारण्यात आलेली ही योजना २००५ पासून कार्यान्वित झाली अन् नागरिकांच्या घरात हक्काचं पाणी आलं. या योजनेमुळे सातारकरांची पाण्याची चिंता मिटली असली तरी या योजनेवर दरवर्षी कोट्यवधींचा खर्च करावा लागत आहे.
धरणातून पाणी उचलणे, शुद्धिकरण करणे, वितरण व्यवस्था व देखभाल दुरुस्ती आदी कामांवर वर्षाकाठी सुमारे २ कोटी रुपये खर्च करावा लागत आहे. यामध्ये केवळ वीजबिलाचा खर्च हा दीड कोटींच्या घरात आहे. गेल्या पंधरा वर्षांचा विचार केल्यास शहापूर योजनेवर सुमारे ३० कोटी रुपये खर्च झाला आहे. तो टाळण्यासाठी आता प्रशासनाला नव्याने साकारत असलेली कास योजना अधिक गतिमान करायला हवी, असे सूज्ञ नागरिकांचे म्हणणे आहे.
अशी आहे शहापूर योजना
- योजना २००५ साली कार्यान्वित
- उरमोडी धरणातून पाणी उचलावे लागते
- वीज बिलावर महिन्याला १४ लाख खर्च
- गाळ काढणे, देखभाल दुरुस्तीवर वार्षिक २९ लाख खर्च
- दररोज ७ लाख ५० हजार लीटर पाणीपुरवठा
कास योजना का हवी
- तलावातून पाणी उचलावे लागत नाही
- सायफन पद्धतीने पाणी येते
- केवळ उन्हाळ्यात इंजिन लावून पाणी पाटात सोडले जाते
- देखभाल दुरुस्तीवर वर्षाला ३० लाख खर्च
- दररोज ५.५० लाख लीटर पाणीपुरवठा
‘कास’ उंचीवाढीमुुळे अनेक प्रश्न मार्गी
शहराच्या पूर्व भागाला जीवन प्राधिकरणकडून पाणीपुरवठा केला जातो. त्याबदल्यात वर्षाकाठी ७ हजार रुपये पाणीपट्टी नागरिकांकडून आकारली जाते, तर पालिका कररुपात केवळ २ हजार रुपये घेते. कास धरणाची उंची वाढल्यानंतर धरणाच्या पाणीसाठ्यात पाच पटीने वाढ होणार असून, नागरिकांना मुबलक पाणी मिळणार आहे. पालिकेकडून जीवन प्राधिकरणलादेखील पाणी दिले जाऊ शकते. पालिका हद्दीत नव्याने समाविष्ठ झालेल्या भागालादेखील कास योजना वरदान ठरू शकते.