‘किसन वीर’कडून माणसं उभी करण्याचं काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 12:16 AM2017-08-15T00:16:11+5:302017-08-15T00:16:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
पाचवड : ‘माणसात परमेश्वर पाहणे आवश्यक असून किसन वीर कारखान्याचा परिसर पाहिल्यानंतर हेच काम येथे सुरू असल्याचे दिसून येते. एक सहकारी साखर कारखाना आपल्या कामातून माणसं उभं करण्याचे काम करत आहे, हे चित्रच वेगळे असून आजच्या काळात ते आशादायी आहे,’ असे प्रतिपादन बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी केले.
भुर्इंज (ता. वाई, जि. सातारा) येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्यावतीने कारखान्याचे संस्थापक, स्वातंत्र्यसेनानी, देशभक्त किसन महादेव तथा आबासाहेब वीर यांच्या ११२ व्या जयंतीनिमित्त कारखाना कार्यस्थळावर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी किसन वीर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ माजी मंत्री आणि संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक शंकरराव कोल्हे यांना यंदाचा ‘आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार’ तर हिवरे बाजारचे (जि. अहमदनगर) आदर्श सरपंच पोपटराव पवार यांना ‘आबासाहेब वीर प्रेरणा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. सन्मानपत्र, अनुक्रमे एक लाख एकावन्न हजार रुपये रोख, शॉल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले होते. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले, उपाध्यक्ष गजानन बाबर, डॉ. निलिमा भोसले, खंडाळा साखर कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव गाढवे, उपाध्यक्ष व्ही. जी. पवार, ज्ञानदीप सोसायटीचे चेअरमन जिजाबा पवार, संजीवनी कारखान्याचे चेअरमन बिपीन कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. पाटील पुढे म्हणाले, ‘जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर ध्येय बाळगले पाहिजे. ध्येयाशिवाय यशस्वी होणे कठीण आहे. त्यासाठी ध्येय आणि प्रयत्नांमध्ये सातत्य असले पाहिजे. अशा ध्येयांना, प्रयत्नांना पाठबळ देण्याचे काम ‘आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार’ आणि ‘आबासाहेब वीर प्रेरणा पुरस्कारा’तून होत आहे. या ठिकाणी ज्यांना पुरस्कार दिला, ते दोघेही आपापल्या क्षेत्रात यशस्वी झाले असून, या पुरस्कारांच्या माध्यमातून योग्य व्यक्तींचा गौरव झाला आहे.’
यावेळी ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी मान्यवरांनी किसन वीर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. मान्यवरांचा सत्कार संचालक मंडळाने केला. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन व सन्मानपत्रांचे वाचन केले.
कोल्हे, पवार यांचं कार्य दिशादर्शक
कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले म्हणाले, ‘जाज्वल्य देशभक्तीचे प्रतिक असणारे आबासाहेब वीर यांच्या नावाने हा पुरस्कार असल्याने या पुरस्काराचे मोल मोठे आहे. या नावाच्या पुरस्काराला साजेसेच पुरस्कारमूर्ती शंकरराव कोल्हे आणि पोपटराव पवार यांच्या रुपाने लाभले आहेत. त्यांचे कार्य सर्वांनाच दिशा व प्रेरणा देणारं आहे. त्यांनी केलेलं कार्य त्यांच्या गावापुरतं मर्यादित राहिलं नसून या कामातून अनेक गावांचा कायापालट झाला पाहिजे.’
पुरस्काराचा आनंद सर्वात मोठा : पवार
हिवरे बाजारचे (जि. अहमदनगर) आदर्श सरपंच पोपटराव पवार म्हणाले, ‘मदन भोसले यांनी आपल्या रचनात्मक, विधायक व दुरदृष्टीतून किसन वीर साखर कारखान्याचे वटवृक्षात रूपांतर केले आहे, याचा मनस्वी आनंद होत आहे. आजचा दिवस खूप वेगळा आहे. मिळालेला पुरस्कार आजपर्यंतच्या मिळालेल्या सर्व पुरस्कारांमध्ये सर्वात उंचीचा पुरस्कार आहे.’