महाबळेश्वरातील स्मशानभूमी प्रकल्पाचे काम रखडले

By admin | Published: November 20, 2014 09:44 PM2014-11-20T21:44:27+5:302014-11-21T00:26:57+5:30

पालिकेचे दुर्लक्ष : बिल अदा न झाल्याने ठेकेदार गायब

Work of Mahabaleshwar graveyard project | महाबळेश्वरातील स्मशानभूमी प्रकल्पाचे काम रखडले

महाबळेश्वरातील स्मशानभूमी प्रकल्पाचे काम रखडले

Next

महाबळेश्वर : पालिकेत सध्या सत्ताधारी गटातील काही नगरसेवकांचा मनमानी कारभार सुरू आहे. नागरिकांच्या अनेक जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे. शहराच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या स्मशानभूमी प्रकल्पाचे काम गेली अनेक महिने बंद आहे. या प्रकल्पाचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी जोर धरत आहे. रस्ता डांबरीकरण व वाहतुकीच्या कोंडीसाठी रस्त्यावर उतरणारी शिवसेना याबाबत गप्प का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
वेण्णा धरणाच्या पाण्याच्या फुगवट्यात महाबळेश्वरची हिंदू स्मशानभूमी गेल्याने पालिकेने या स्मशानभूमीपासून थोड्या अंतरावर एक तात्पुरते शेड बांधून दहनविधीची सोय केली आहे. या स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता एका खासगी संस्थेच्या जागेतून जात असल्याने त्या रस्त्याचे डांबरीकरण अथवा देखभाल पालिकेला करता येत नाही. पावसाळ्यात स्मशानभूमीपर्यंत पोहोचणे म्हणजे एक दिव्यच आहे. म्हणून पालिकेने महूसल विभागाच्या शेजारी वनविभागाच्या जागेत स्मशानभूमी बांधण्याचा निर्णय घेतला. वन विभागाकडून यासाठी जागा मिळविण्यासाठी पालिकेला खूप वर्षे लागली. मागील वर्षी ती जागा पालिकेच्या ताब्यात मिळाली. याठिकाणी आदर्श स्मशानभूमी बांधण्याचा आराखडा पालिकेने तयार केला. त्यानुसार मागील वर्षी दफन व दहनविधीसाठी लागणारी सोयीसुविधा नागरिकांना मिळतील, असा आराखडा तयार करून त्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र, पावसाळा सुरू झाल्याने काम बंद करण्यात आले. परंतु पावसाळा संपून आता दोन महिने झाले तरी हे काम पुन्हा सुरू झाले नाही. ठेकेदाराने बांधकाम साहित्यासह गाशा गुंडाळला आहे. पालिकेने बिल अदा केले नसल्याने ठेकेदाराने काम बंद केल्याचे समजते. पालिकेत सुरू असलेल्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Work of Mahabaleshwar graveyard project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.