मोरया ग्रुपचे कार्य आदर्शवत - सरिता इंदलकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:35 AM2021-04-14T04:35:06+5:302021-04-14T04:35:06+5:30
किडगाव : सध्याचे युवक हे मोबाईलच्या विळख्यात अडकलेले आपणाला पाहायला मिळत आहे. मात्र नेले येथील युवक आदर्शवत काम करत ...
किडगाव : सध्याचे युवक हे मोबाईलच्या विळख्यात अडकलेले आपणाला पाहायला मिळत आहे. मात्र नेले येथील युवक आदर्शवत काम करत असल्याचे चित्र आपणाला पाहावयास मिळाले आहे. असे गौरवोद्गार सातारा पंचायत समितीच्या सभापती सरिता इंदलकर यांनी काढले.
नेले ता. सातारा येथील मोरया ग्रुपच्या वतीने आयोजित भव्य रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी इंदलकर बोलत होत्या. यावेळी सरपंच रूपाली कांबळे, जाहीर फारस, मंगेश जाधव, बाळू पाटील, इंद्रजीत पाटील, आनंदा कांबळे, यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
इंदलकर पुढे म्हणाल्या, मोरया ग्रुप या मंडळाचे काम आदर्शवत असून कोरोना काळात लोक बाहेर येण्यास घाबरत आहेत. मात्र, सातारा जावली विधानसभेचे लोकप्रिय आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसा निमित्त येथील तब्बल ४७ युवकांनी स्वयंस्फूर्तीने बाहेर येऊन रक्तदान केले. येथील युवक नेहमीच समाजासाठी आदर्शवत काम करत असतात. या युवकांचा आदर्श तर गावातील युवकांनी घ्यावा. आपण पुढे युवकांसाठी आणि नेले विभागाचा विकासासाठी प्रयत्नशील राहू.
कार्यक्रमास किडगावच्या सरपंच शुभांगी चोरगे, उपसरपंच इंद्रजीत ढेंबरे, अजिंक्यतारा सूतगिरणीचे संचालक सुरेश टिळेकर तसेच प्रकाश जाधव, महादेव जाधव, नीलेश जाधव यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. रक्तदान शिबिरासाठी माउली ब्लड बँकेचे मोठे सहकार्य लाभले.
चौकट
वर्ग मित्रासाठी रक्तदान
सातारा पंचायत समितीच्या सभापती सरिता इंदलकर यांचे पती संभाजी इंदलकर यांचे वर्गमित्र नेले येथील प्रगतशील शेतकरी धनाजी जाधव व त्यांच्या सुविद्य पत्नी रेश्मा जाधव या दोघाही दाम्पत्याने आपल्या वर्गमित्राच्या आग्रहाखातर रक्तदान करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला.