नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे कार्य उल्लेखनीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:24 AM2021-07-19T04:24:32+5:302021-07-19T04:24:32+5:30
नागठाणे : ‘डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने आतापर्यंत गावात अनेक समाजहितोपयोगी केलेले कार्य उल्लेखनीय आहे,’ असे प्रतिपादन संचालक संजय ...
नागठाणे : ‘डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने आतापर्यंत गावात अनेक समाजहितोपयोगी केलेले कार्य उल्लेखनीय आहे,’ असे प्रतिपादन संचालक संजय कुंभार यांनी केले.
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा, ता. अलिबाग यांच्या वतीने त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रविवारी नांदगाव, ता. सातारा येथे प्राथमिक शाळा परिसरात सह्याद्री सहकारी कारखान्याचे संचालक संजय कुंभार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. या वेळी मुख्याध्यापिका वैशाली सुतार, सरपंच सारिका चव्हाण यांनी प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले.
वृक्षारोपणप्रसंगी सरपंच सारिका चव्हाण, उपसरपंच गजानन देशमुख, पोलीस पाटील बाळासो घोरपडे, आजी-माजी फौजी संघटनेचे संपत चव्हाण, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन मनोहर बडे, माजी चेअरमन विठ्ठल देशमुख, मुख्याध्यापिका वैशाली सुतार, सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.
पर्यावरणाचे रक्षण, संवर्धन व्हावे या उद्देशाने स्वच्छतादूत, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी, सचिन धर्माधिकारी, उमेश धर्माधिकारी, राहुल धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने विविध प्रकारची फळझाडे, औषधी झाडे लावली असून, या झाडांच्या संरक्षणार्थ सभोवताली कुंपण करण्यात येणार आहे. नांदगाव (ता. सातारा) प्राथमिक शाळा परिसरात करंज, चिंच, जांभूळ, सीताफळ, बदाम, फणस, बेल, सोनचाफा अशा विविध प्रकारच्या शंभर झाडांची लागवड करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वृक्षारोपणप्रसंगी प्रशासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करण्यात आले होते.
(चौकट)
विविध जातींच्या वृक्षांचे रोपण...
महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या बारा वर्षांपासून आतापर्यंत जिल्ह्यात फळझाडे, फुलझाडे, जंगली, औषधी वनस्पती, अशोक, सुरू, सिल्व्हा, वड, पिंपळ, आवळा, बेहडा आदी प्रकारांसह हजारो झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले असून, प्रतिष्ठानच्या सदस्यांकरवी त्याचे संरक्षण, संवर्धन केले जात आहे. यापूर्वी नांदगाव येथील महादेव मंदिर परिसरातील झाडे जगवून ग्रामपंचायतीस सुपुर्द करण्यात आली आहेत.