सातारा-टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडलेले, आक्रमक ग्रामस्थांचे पुसेगावात रास्ता रोको आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 03:53 PM2022-02-11T15:53:01+5:302022-02-11T15:53:37+5:30

तीन वर्षांपासून सातारा-टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्गाचे पुसेगाव बाजारपेठेतील काम रखडल्याने नागरिक विविध समस्यांनी त्रस्त झाले

Work on Satara Tembhurni National Highway stalled, Rasta Roko movement in Pusegaon | सातारा-टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडलेले, आक्रमक ग्रामस्थांचे पुसेगावात रास्ता रोको आंदोलन

सातारा-टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडलेले, आक्रमक ग्रामस्थांचे पुसेगावात रास्ता रोको आंदोलन

Next

पुसेगाव : पुसेगाव बाजारपेठेतून जाणाऱ्या सातारा-टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्गाचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम सुरू व्हावे, यासाठी प्रशासनाच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रशासनाच्यावतीने नायब तहसीलदार रवीराज जाधव यांनी गावातील शासकीय विद्यानिकेतन ते येरळा नदीपर्यंतच्या रस्त्याच्या कामाबाबत पूर्णपणे सहकार्य करून रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी प्रशासन प्रयत्न करेल, अशी ग्वाही दिली.

येथील छत्रपती शिवाजी चौकात आज, गुरुवारी सकाळी अकरा वाजता काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात माजी पंचायत समिती सदस्य मोहनराव जाधव, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव, सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त योगेश देशमुख, माजी चेअरमन शिवाजीराव जाधव, उपसरपंच पृथ्वीराज जाधव सहभागी झाले.

डॉ. सुरेश जाधव म्हणाले, ‘तीन वर्षांपासून सातारा-टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्गाचे पुसेगाव बाजारपेठेतील काम रखडल्याने नागरिक विविध समस्यांनी त्रस्त झाले. रस्त्याचे काम सलग करावे. शासकीय विद्यानिकेतन ते येरळा नदीपर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंची गटारे व पाणी पुरवठा योजनेची कामे संबंधित ठेकेदाराने करावीत. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या बाधित ग्रामस्थांना नियमांनुसार नुकसान भरपाई संबंधीत कंपनीने द्यावी.’

प्रताप जाधव, उपसरपंच पृथ्वीराज जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे यांनी बंदोबस्त ठेवला होता.

जागांची मोजणी करा : प्रांताधिकारी

दरम्यान आंदोलन झाल्यानंतर देवस्थान ट्रस्ट कार्यालयात संयुक्त बैठक झाली. प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी म्हणाले, ‘पोलीस ठाण्यापासून येरळा नदीपर्यंतच्या रस्त्यावर पीडब्लूडीच्या नकाशाप्रमाणे बारा मीटरच्या आरओडब्लूमध्ये बाधितांचे अतिक्रमण दिसून येत आहे.

बाधितांच्या म्हणण्यानुसार हे अतिक्रमण नसून ही जागा त्यांच्या मालकीची असेल, तर त्यांनी या जागांची मोजणी करून घ्यावी. मोजणीप्रमाणे ही जागा बाधितांच्या मालकीची असल्याचे आढळल्यास या लोकांना भरपाई मिळण्यासाठी आम्ही संबंधित विभागाकडे पाठपुरावा करू.

या मिळकतीची मोजणी तातडीने होण्यासाठीच्या सूचना सिटी सव्हेंच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. यावेळी पोलीस ठाण्यापासून डॉ. जाधव यांच्या दवाखान्यापर्यंत रस्त्याचे काम मंगळवारपासून सुरू होईल, असे सूर्यवंशी यांनी नमूद केले.

Web Title: Work on Satara Tembhurni National Highway stalled, Rasta Roko movement in Pusegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.