गणेशखिंडीतील गळती काढण्याचे काम पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:41 AM2021-05-08T04:41:26+5:302021-05-08T04:41:26+5:30
पेट्री : एकीकडे कास तलावातील पाणी पातळी खालावत असताना दुसरीकडे कित्येक दिवसांपासून गणेशखिंड परिसरातील कासच्या एअर व्हॉल्व्हच्या गळतीमुळे लाखो ...
पेट्री
: एकीकडे कास तलावातील पाणी पातळी खालावत असताना दुसरीकडे कित्येक दिवसांपासून गणेशखिंड परिसरातील कासच्या एअर व्हॉल्व्हच्या गळतीमुळे लाखो लीटर पाणी वाया जात असल्याचे चित्र दिसून येत होते. ही गळती काढली असून वाया जाणारे पाणी थांबले आहे.
‘भरउन्हाळ्यात गणेशखिंडीत पाण्याचे पाट,’ या शीर्षकाखाली ‘लोकमत’मध्ये बातमी प्रसिद्ध करण्यात आली. या बातमीची दखल घेऊन तत्काळ प्रशासनाकडून व्हॉल्व्हची गळती काढण्यात आली.
कास तलावामधून सातारा शहराच्या काही भागात पाणीपुरवठा होत असतो. सद्य:स्थितीला उन्हाची तीव्रता तसेच शहराला दररोज होत असलेल्या एक ते दीड इंचापर्यंतचा पाणीपुरवठा यामुळे कास तलावातील शिल्लक पाणीसाठा नऊ फुटाच्यादेखील खाली आला आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत शहराला होणारा पाणीपुरवठा सुरळीत राहून पाण्याचा अपव्यय होऊ नये तसेच नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे वारंवार आवाहन केले जात असताना मात्र दुसरीकडे सातारा-कास रस्त्यावरील गणेशखिंड परिसरातील कासच्या एका एअर व्हॉल्व्हच्या ठिकाणी गेल्या कित्येक दिवसांपासून गळती लागून आतापर्यंत लाखो लीटर पाणी वाया जात होते. ‘लोकमत’मध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाकडून तत्काळ या व्हॉल्व्हची गळती काढण्याचे काम वेगाने पूर्ण करण्यात आले.
०७पेट्री-वाॅटर
गणेशखिंड परिसरातील कासच्या एअर व्हॉल्व्ह ठिकाणी प्रशासनाकडून दुरुस्ती करून पायाची गळती थांबविण्यात आली. (छाया : सागर चव्हाण)