मांढरदेव यात्रेत जबाबदारीने काम करा
By admin | Published: January 13, 2016 12:03 AM2016-01-13T00:03:26+5:302016-01-13T01:08:28+5:30
अश्विन मुद्गल : यात्रा आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना; मंदिर परिसराची पाहणी
मांढरदेव : चालू वर्षी होणाऱ्या काळुबाई देवीच्या वार्षिक यात्रेत प्रशासनाच्या सर्वच विभागांने जबाबदारीने काम करावे व काळुबाई यात्रा सुरळीत पार पाडावी, अशा सूचना मंगळवारी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी मांढरदेव येथे दिल्या. मांढरदेव येथील काळुबाई यात्रेच्या नियोजन आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी, एन. के. पाटील, वाईचे प्रांताधिकारी अस्मिता मोरे, भोरच्या प्रांताधिकारी मोसमी बर्डे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे, वाईचे तहसीलदार सदाशिव पडदुणे, वाईच्या मुख्याधिकारी आशा राऊत, वाईचे पोलीस अधीक्षक दीपक हुंबरे, गटविकास अधिकारी दीपा बापट व इतर उपस्थित होते.
चालू वर्षी होणाऱ्या काळुबाई यात्रेच्या नियोजनाची आढावा बैठक मांढरदेव येथील एमआयडीसीच्या इमारतीमध्ये पार पडली. यावेळी यात्रा कालावधीमध्ये प्रशासनाच्या प्रत्येक विभागाने केलेले नियोजनाचा आढावा जिल्हाधिकारी मुदगल यांनी घेतला. यात्रा कालावधीमध्ये पशुहत्या बंदी, नारळ फोडणे, वाद्य वाजवणे, फटाके वाजवणे, झाडाला लिंबे, खिळे, बाहुल्या ठोकणे यावर बंदी घालण्यात आली आहे. यात्रा कालावधीत शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात यावा. त्यासाठी योग्य ते नियोजन करावे, एसटी बसेसच्या फेऱ्या, वीजवितरण कंपनीने सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी पथके नेमावीत, पोलीस यंत्रनेने आवश्यक तेवढी कुमक साठवून यात्रा कालावधीत कायदा व सुव्यवस्था ठेवावी. अन्न व भेसळ विभागाने पाण्याचे व अन्नाचे नमुने घ्यावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी दिल्या.
यात्रा कालावधीमध्ये मंदिर परिसरापासून दीड किलोमीटर अंतरापर्यंत तो पार्किंग झोन घोषित केला आहे. यावेळी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी काळुबाई मंदिर व परिसराची पाहणी केली. चढण्याच्या व उतरण्याच्या पायऱ्या, बॅरिगेटसची रचना याविषयी योग्य सूचना केल्या.
यावेळी गोंजीबाबा व मांगीरबाबा या मंदिराचे पुजारी अरविंद वानखेडे, संदीप जाधव, अशोक जाधव यांनी यात्राकाळात काळुबाईच्या दर्शनानंतर भाविकांना व मांगीरबाबा यांचे दर्शन घेता यावे, अशी बॅरिगेटसची रचना करावी, अशी मागणी केली
या बैठकीसाठी मांढरदेवच्या सरपंच अनिता मांढरे, उपसरपंच शंकर मांढरे, ग्रामसेवक डी. बी. तळेकर, देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त सतीश मांढरे, सुनील मांढरे, सोमनाथ गुरव, रामदास गुरव, सचिव लक्ष्मण चोपडे, वीजवितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता ए. एस. खुस्पे, ग्रामीण पाणीपुरवठाचे उपअभियंता आर. बी. साठे, वाईचे. पोलीस निरीक्षक रमेश गलांडे, मोटारवाहन निरीक्षक चव्हाण, वाई आगाराचे जाधव व इतर अधिकारी वर्ग उपस्थित
होते. (प्रतिनिधी)
४८ तासांत जोडणी न दिल्यास बीएसएनएलवर गुन्हा
सातारा : वाई तालुक्यातील मांढरदेव येथील श्री काळुबाई देवी यात्रेसाठी बीएसएनएलकडून आवश्यक ती सेवा, त्याचबरोबर ४८ तासांत दूरध्वनी जोडणी न मिळाल्यास बीएसएनएलवर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ कलम ५१ नुसार व्यक्तिगत नावाने गुन्हा दाखल करा, असे आदेश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी वाई तहसीलदारांना दिले. मांढरदेव येथील श्री काळुबाई देवीची यात्रा दि. २२ ते २४ जानेवारी या कालावधीत होत आहे. त्या अनुषंगाने संबंधित यंत्रणांनी केलेल्या कार्यवाहीबाबत जिल्हाधिकारी मुदगल यांनी मंगळवारी मांढरदेव येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सभागृहात बैठक घेऊन आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
प्रवेशाच्या ठिकाणी तपासणी नाके उभी करावीत
वाहतुकीच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात
वाई आणि भोर या दोन्ही बाजूंना कडेकोट पोलीस बंदोबस्त
तपासणी नाक्यावर मद्यपींसाठी ब्रेथअनालायझरची
अग्निशमन यंत्रणा सक्षमपणे उभी करावी
मंदिराच्या विश्वस्तांनी कार्बनडायआॅक्साईडच्या फायर रिस्टिंक्शन्स बसवावे
भोर,वाई या दोन्ही बाजूंकडील तुटलेले कठडे दुरुस्त करून घ्यावेत
दर्शन रांगांवर स्वयंसेवक तसेच सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवावे
निर्माल्य गोळा करण्यासाठी निर्माल्य कुंड्याचे नियोजन करावे
एकाच ठिकाणी सूचना केंद्र निर्माण करून सूचना ध्वनिक्षेपकावरून
देण्यात यावेत
तीव्र उतार, धोकादायक वळणे या ठिकाणी दुकाने लावू नयेत
दुकाने लावल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत
वीजवितरण कंपनीने स्टॉलधारकांकडील जनरेटरची तपासणी करावी
आधुनिक सुसज्ज अशी रुग्णवाहिका औषधोपचारासह तैनात ठेवावी
परिवहन विभागाने सुस्थितीतील एसटी वाहनांची व्यवस्था करावी
भाविकांसठी फिरती शौचालय, पाण्याची व्यवस्था करावी