सातारा-लातूर महामार्गाचे काम पुसेगावात रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 09:05 AM2021-02-05T09:05:35+5:302021-02-05T09:05:35+5:30
पुसेगाव : ‘येथील प्रस्तावित रिंगरोडला शिवसेनेचा विरोध असून सातारा-पंढरपूर राज्यमार्ग हा गावातून झाला पाहिजे, रस्ता रुंदीकरण करताना मुख्य ...
पुसेगाव : ‘येथील प्रस्तावित रिंगरोडला शिवसेनेचा विरोध असून सातारा-पंढरपूर राज्यमार्ग हा गावातून झाला पाहिजे, रस्ता रुंदीकरण करताना मुख्य बाजारपेठेतील बाधित दुकानदार, मालक व ग्रामस्थांना नुकसानभरपाई मिळालीच पाहिजे, यासाठी शिवसेना आग्रही भूमिका घेणार आहे,’ अशी माहिती शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव यांनी दिली.
सध्या चालू असलेले सातारा-पंढरपूर रस्त्याचे काम पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे व रेंगाळलेल्या अवस्थेत होत असून सुद्धा लोकप्रतिनिधींचे याकडे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. रस्त्याच्या दुरवस्थेने बाजारपेठ पूर्ण उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. गावातील रस्ता रुंदीकरणास गावकऱ्यांचा कोणताही विरोध नाही; परंतु काही निवृत्त अधिकारी गावाचा व भागाचा विकास या नावाखाली पुसेगावच्या रिंगरोडचा प्रस्ताव शासनाकडे सादर करीत आहेत; परंतु हा रस्ता गावाच्या मुख्य बाजारपेठेतून न गेल्यास येथील सर्व बाजारपेठ पूर्ण इतिहासजमा होईल, बेरोजगार युवकांना कोणतेही साधन राहणार नाही व गाव विकासापासून दूर होईल, अशी शिवसेनेची भूमिका असून बाहेरून जाणाऱ्या रस्त्याला शिवसेनेचा कडवा विरोध राहणार असल्याचे प्रताप जाधव यांनी सांगितले.
चौकट..
रस्ते विकास महामंडळाच्यावतीने सुरू असलेले सातारा-पंढरपूर महामार्गाचे रस्त्याचे काम पुसेगावातील मुख्य चौकापासून सुमारे दोन किलोमीटरवर शासकीय विद्यानिकेतनपर्यंत आणून थांबवले आहे. परंतु कोणत्या कारणाने पुसेगावातील काम थांबवले आहे, याचे स्पष्टीकरण या विभागाकडून मिळत नाही. कोणत्या तरी राजकीय गटाला बळी पडून ही सर्व यंत्रणा काम करते का? अशी शंका नागरिक व्यक्त करत आहेत.
गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्याशी चर्चा केली असून, पुसेगावातील रस्त्याच्या कामाबाबत सकारात्मक तोडगा तातडीने काढण्याचे त्यांनी आश्वासन दिले असल्याचे प्रताप जाधव यांनी सांगितले.