मायणीत राज्यमार्गाचे काम संथगतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:36 AM2021-05-01T04:36:08+5:302021-05-01T04:36:08+5:30
मायणी : मायणी गावभाग व चांदणी चौक परिसरात गेल्या सोळा महिन्यांपासून राज्य मार्ग रुंदीकरणाचे काम अतिशय संथगतीने सुरू असल्याने ...
मायणी : मायणी गावभाग व चांदणी चौक परिसरात गेल्या सोळा महिन्यांपासून राज्य मार्ग रुंदीकरणाचे काम अतिशय संथगतीने सुरू असल्याने व्यापाऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे, तर वाहनचालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे.
याबाबत माहिती अशी की, मायणी परिसरातून जाणाऱ्या मल्हारपेठ - पंढरपूर राज्य मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. मायणीतील चांदणी चौक व गाव भागातून जाणाऱ्या या राज्य मार्गाच्या रुंदीकरणाचे काम गतवर्षी
जानेवारी महिन्यात सुरू करण्यात आले होते. मायणीतील भारतमाता विद्यालयापासून चांदणी चौक, मराठी शाळा, बसस्थानक परिसर, चावडी चौक, उभीपेठ व नवीपेठ या भागातून जाणाऱ्या फक्त दोन किलोमीटर अंतराचे काम गेल्या १६ महिन्यांपासून सुरू आहे.
मायणी गावाची संपूर्ण बाजारपेठ याच मार्गावर आहे. त्यामुळे गेल्या १६ महिन्यांपासून अतिशय संथगतीने सुरू असलेल्या या राज्य मार्गाच्या रुंदीकरणामुळे व्यापारीपेठ बंद आहे. त्यातच गतवर्षीपासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सतत होणाऱ्या शासनाच्या व स्थानिक प्रशासनाच्या नियमांमुळे व्यापारी पूर्ण अडचणीत सापडला आहे.
तसेच अनेक ठिकाणी हे काम अर्धवट राहिले आहे.
राज्य मार्गाच्या कडेने सुरू असलेले गटारीचे कामही विविध कारणांमुळे लटकले आहे, तर काही ठिकाणी संथगतीने सुरू आहे. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. गुरुवारी दुपारी झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी राज्य मार्गाच्या रुंदीकरणाच्या कामात पाणी साठले, तर अनेक ठिकाणी कच्चा रस्ता खचला आहे.
या खचलेल्या रस्त्यातून वाहने चालविताना वाहन चालकांची मोठी कसरत होत होते, तर काही वेळेला वाहने या ठिकाणी अडकत होती. रस्त्याला योग्य लेवल नसल्याने अनेक ठिकाणी चिखलयुक्त पाणी साठले होते. त्यामुळे संबंधित विभागाने मायणी गावभाग व चांदणी चौक परिसरातील काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी वाहनचालक, व्यापारी व स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे.
मलकापूर - पंढरपूर राज्य मार्ग रुंदीकरणाच्या कामादरम्यान चांदणी चौक परिसरामध्ये अर्धवट कामामुळे चिखलात टॅंकर अडकला आहे. (छाया : संदीप कुंभार)