पुसेगावातून जाणाऱ्या राज्यमार्गाचे काम त्वरित सुरू करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:11 AM2021-03-13T05:11:38+5:302021-03-13T05:11:38+5:30
पुसेगाव : पुसेगावातून जाणाऱ्या सातारा-लातूर रस्त्याच्या काॅंक्रीटीकरणाच्या दोन वर्षे रखडलेल्या कामाला लवकरच सुरूवात करण्यात येईल,’ अशी ग्वाही मेगा इंजिनिअरिंगचे ...
पुसेगाव : पुसेगावातून जाणाऱ्या सातारा-लातूर रस्त्याच्या काॅंक्रीटीकरणाच्या दोन वर्षे रखडलेल्या कामाला लवकरच सुरूवात करण्यात येईल,’ अशी ग्वाही मेगा इंजिनिअरिंगचे प्रकल्प व्यवस्थापक एम. मधु तसेच बी. नारायण यांनी दिली. या कामात येणाऱ्या अडचणींची सोडवणूक करण्यासाठी पुसेगाव ग्रामपंचायत व श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची लेखी ग्वाही सेवागिरी ट्रस्टच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत देण्यात आली.
या राज्यमार्गाचे काम येथील पब्लिक स्कूलच्या प्रवेशद्वारापर्यंत येऊन ते दोन वर्षांपासून रखडले आहे. गावातील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. त्यामुळे पुसेगावमधून जाणाऱ्या रस्त्याचे या काम तातडीने सुरू व्हावे या मागणीसाठी तसेच या कामात येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी मठाधिपती सुंदरगिरी महाराज, श्री सेवागिरी ट्रस्टचे अध्यक्ष मोहनराव जाधव, माजी अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, सरपंच विजयराव मसणे, उपसरपंच पृथ्वीराज जाधव, विश्वस्त योगेश देशमुख, प्रताप जाधव, सुरेश जाधव, ग्रामपंचायत सदस्य विशाल जाधव, गणेश जाधव, मधुकर टिळेकर, सूरज जाधव, सोहराब शिकलगार, ग्रामविकास अधिकारी नाळे उपस्थित होते.
गावातील रस्त्याच्या काॅंक्रीटीकरणात पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप लाईन व व्हॉल्व्हचा अडथळा असल्याचे मधु यांनी सांगितले. हा अडथळा दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीतर्फे व्हॉल्व्ह बाजूला करुन दिले जातील. त्यामुळे कामाला त्वरित सुरुवात करावी, दोन ठिकाणी पुलांची कामेही प्राधान्याने करावीत अशी मागणी करण्यात आली. गावात चार-पाच दिवसांतून एकदा पिण्याचे पाणी सोडले जाते. रस्त्याच्या कामामुळे लोकांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये यासाठी पुसेगाव ग्रामपंचायतीतर्फे टँकरद्वारे पाणी पुरवठा करून लोकांना पाण्याची टंचाई भासू देणार नाही असे डॉ. जाधव यांनी सांगितले. या रस्त्याचे काम सुरू असताना जुनी पाईपलाईन बदलून नवीन पाईपलाईन बसवणार असल्याचे मधु यांनी सांगितले. काही ठिकाणी येणाऱ्या विजेच्या खांबांचा तसेच काही घरांजवळ असलेला वीजवाहक तारांचा अडथळा वीज वितरणच्या सहकार्याने दूर करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
नऊ मीटर रुंदीच्या या रस्त्याच्या दुतर्फा दीड मीटरची गटारे व त्याबाहेरील जागेत पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या बसविण्यात येणार आहेत. प्रारंभी पब्लिक स्कूलचे प्रवेशद्वार ते पुसेगाव पोलीस ठाण्यापर्यंतच्या कामास प्रारंभ होणार आहे. पोलीस ठाणे ते सेवागिरी मंदिरापर्यंतच्या कामासाठी जागा अधिग्रहणाचे काम अद्याप झालेले नाही. बाधित घरांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आपण प्रयत्नशील असून जागेच्या मोजणीसाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. जाधव यांनी केले.
११पुसेगाव-रोड
पुसेगाव येथील रखडलेल्या राज्यमार्गाच्या कामासंदर्भात बैठक झाली. यावेळी प्रकल्प व्यवस्थापक मधु, मोहनराव जाधव, डॉ. सुरेश जाधव, सरपंच विजयराव मसणे, गणेश जाधव उपस्थित होते. (छाया : केशव जाधव)