सुपने-किरपे पुलाचे काम अंतीम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 03:24 PM2017-07-22T15:24:07+5:302017-07-22T15:24:07+5:30
ढेबेवाडी-पाटण मागार्तील दुवा : प्रवास होणार सुखकर; वेळेचीही बचत
आॅनलाईन लोकमत
कुसूर (जि. सातारा), दि. २२ :कऱ्हाड तालुक्यातील सुपने ते किरपे दरम्यान कोयना नदीवरील पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच हे काम पूर्ण होणार असून येत्या काही महिन्यात पुल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. सुपने-किरपे-अंबवडे या प्रमुख जिल्हा मार्गावर कोयना नदीवर पुलाचे बांधकाम गत अडीच वर्षांपासून सुरू आहे.
कऱ्हाड-ढेबेवाडी मागार्ला पयार्यी मार्ग तयार होणार आहे. तसेच ढेबेवाडी रस्त्यावरील वाहतुकीचा ताणही कमी होणार आहे. कऱ्हाडमधून सुपने ते किरपे व पुढे येणके, आणे, अंबवडे, काढणे, मालदन, ढेबेवाडी असा हा नवीन मार्ग तयार होणार असल्याने संबंधित गावांना दळणवळणाला गती येणार आहे. तसेच काही गावांना कऱ्हाडला येण्यासाठीचे अंतर कमी होणार आहे.
सध्या कऱ्हाडातून ढेबेवाडीला जायचे असल्यास शहरातून मलकापुरला व पुढे ढेबेवाडी फाट्यावरून चचेगाव मार्गे ढेबेवाडीला जावे लागते. मात्र, सुपने-किरपे पुल वाहतुकीस खुला झाल्यानंतर कऱ्हाडमधून सुपने व तेथून किरपे मार्गे थेट कोळे गावापर्यंत पोहोचून ढेबेवाडी रस्त्यावर पोहोचता येणार आहे.
पाटणहून येणाऱ्या वाहनांनाही हा रस्ता ढेबेवाडीला जाण्यासाठी फायदेशिर ठरणार आहे. किरपे तसेच आसपासच्या गावांना कऱ्हाडला येण्यासाठी सध्या तांबवे मार्गे साकुर्डी येथे पोहोचावे लागते. तेथून कऱ्हाड-पाटण मागार्ने कऱ्हाडला यावे लागते. मात्र, या पुलामुळे किरपे गावातून थेट सुपने गावात व पुढे कऱ्हाड-पाटण मार्गावरून कऱ्हाडला जाता येणार आहे. त्यामुळे संबंधित गावांचा जादाचा प्रवास कमी होणार आहे.
सध्या पुलाचे बांधकाम अंतीम टप्प्यात आले आहे. सुपने बाजूने रस्त्याच्या खडीकरणाचे कामदेखील सुरू आहे. पुलाच्या दोन्ही बाजूच्या संरक्षक कठड्यांचे बांधकाम सुरू आहे. किरपे गावाच्या बाजूला रस्ता आणि भरावाचे काम बाकी आहे. काम किती झाले हे पाहण्यासाठी विभागातील अनेक ग्रामस्थ येथे भेट देत आहेत.