२८ टन पत्र्याखाली चिरडून कामगार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2015 10:27 PM2015-09-18T22:27:20+5:302015-09-18T23:15:02+5:30

एक गंभीर : रॅक कोसळल्यामुळे दुर्घटना; दीड तासाने ढिगाऱ्याखालून काढण्यात यश

Workers killed by 28 tons of paper | २८ टन पत्र्याखाली चिरडून कामगार ठार

२८ टन पत्र्याखाली चिरडून कामगार ठार

Next

सातारा/ शाहूपुरी : येथील मोळाचा ओढा परिसरात लोखंडी साहित्याच्या दुकानातील पत्र्याचे (जी. आय. शीट) रॅक दोन कामगारांच्या अंगावर कोसळून शुक्रवारी सकाळी भीषण दुर्घटना घडली. या घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.सुमारे २८ टन लोखंडाच्या ओझ्याखाली हे कामगार दीड तास अडकून पडले होते. आनंदा विठ्ठल मोरे (वय २६, रा. कारी, ता. सातारा) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. गुलाबराव जगन्नाथ पिंपळे (वय ४१रा. आंबळे-कारी, ता. सातारा) हे या दुर्घटनेत गंभीर जखमी झाले आहेत. हे दोघेही माथाडी कामगार असून, कंत्राटी पद्धतीने त्यांची नेमणूक झाली होती. दुर्घटनेबाबत हकीकत अशी की, मोळाचा ओढा परिसरात लोखंडी साहित्याची अनेक दुकाने आहेत. त्यातील उत्तम स्टील अँड टिंबर या दुकानात पत्रा (जी. आय. शीट) गाडीतून उतरविण्याचे काम शुक्रवारी सकाळी सुरू होते. गाडी खाली करून शीटचे ढीग लावत असताना सकाळी सव्वाअकराच्या सुमारास शेजारी असलेले पत्रे ठेवण्याचे रॅक दोन मजुरांच्या अंगावर कोसळले. प्रचंड आवाजामुळे आजूबाजूचे इतर कामगार आणि नागरिक घटनास्थळी धावले. त्यांनी पत्र्यांच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले. परंतु लोखंडी पत्रे सुमारे पाच मिलीमीटर जाडीचे असल्याने एकंदर लोखंडाचे वजन प्रचंड होते. अखेर जेसीबी मागविण्यात आला. त्यानेही पत्रे काढणे अवघड होऊ लागले.अखेर गोडोली भागातून क्रेन मागविण्यात आली. दीड तासानंतर मोरे आणि पिंपळे यांना बाहेर काढण्यात यश आले. रुग्णवाहिकेतून त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात आणि नंतर खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे मोरे यांचा मृत्यू झाला. पिंपळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेसंदर्भात राजेंद्र मारुती पिंपळे (वय ४५, रा. आंबळे-कारी, ता. सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार उत्तम स्टील अँड टिंबरचे मालक उत्तम सुखराम मुथा यांच्याविरुद्ध हलगर्जीपणाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
तीन महिन्यांपूर्वीच विवाह
दुर्घटनेत मृत्युमुुखी पडलेले आनंदा मोरे यांचा तीन महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नीसह आई, भाऊ आणि आजोबा आहेत. कुटुंबाच्या चरितार्थाची जबाबदारी आनंदा यांच्यावरच होती. भाऊ प्रवीण उत्तम धावपटू असून, दीर्घपल्ल्याच्या स्पर्धांमध्ये भाग घेतो; मात्र कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्याला सराव आणि मोठ्या स्पर्धांमधील सहभाग जमत नाही. तो तलाठ्यांच्या हाताखाली, तसेच इतर किरकोळ कामे करतो, अशी व्यथा ग्रामस्थांकडून समजली.


कारी ग्रामस्थांना अश्रू अनावर
सातारा : मोळाचा ओढा परिसरातील लोखंडी साहित्याच्या दुकानात लोखंडी शीट ठेवलेले रॅक कोसळून शुक्रवारी झालेल्या दुर्घटनेत आनंदा विठ्ठल मोरे या कामगाराचा मृत्यू झाल्याचे समजताच कारी (ता. सातारा) ग्रामस्थांना अश्रू अनावर झाले. रुग्णवाहिकेतून मोरे यांचा मृतदेह खासगी रुग्णालयातून बाहेर आणताच त्यांच्या मित्रांनी आक्रोश केला.
माथाडी कामगार म्हणून काम करणारे आनंदा मोरे यांचा अवघ्या २६ व्या वर्षी दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समजताच रुग्णालयाबाहेर उभे असलेले माथाडी कामगार, कारी तसेच आंबळे गावचे ग्रामस्थ आणि मित्रांना शोक अनावर झाला. त्यांच्या दु:खाला संतापाची किनार होती. माथाडी कामगारांच्या संघटनेचे काही पदाधिकारी तातडीने रुग्णालयात दाखल झाले. कामगारांनी आपल्या भावना पदाधिकाऱ्यांसमोर मांडण्यास सुरुवात केली. दु:खाचा डोंगर कोसळलेल्या मोरे कुटुंबाला आधार मिळावा, आर्थिक मदत मिळावी याबरोबरच असे अपघात भविष्यात घडू नयेत यासाठी कठोर कारवाई व्हावी, अशा मागण्या कामगार करीत होते. पदाधिकाऱ्यांनी कामगारांचे म्हणणे ऐकून घेऊन सर्वच बाजूंनी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
सायंकाळी साडेपाचच्या सुमारास रुग्णवाहिका बाहेर आली, तेव्हा सर्वांनी रुग्णवाहिकेभोवती गर्दी केली. मोरे यांचा मृतदेह पाहून मित्रमंडळींना दु:ख अनावर झाले. सर्वांच्याच डोळ्यांत अश्रू असताना, एकमेकांना सावरण्याचा प्रयत्न कारी ग्रामस्थ करीत होते. रुग्णवाहिकेत मोरे यांचे बंधू प्रवीण बसले होते. शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात रवाना झाल्यानंतर ग्रामस्थ भरल्या डोळ्यांनी मोरे यांच्याविषयी भरभरून बोलले. मोरे हेच कुटुंबाचा आधार होते. ‘दररोज वीस किलोमीटर धावण्याचा सराव करणारे त्यांचे बंधू प्रवीण आर्थिक परिस्थितीमुळे मोठ्या मॅरेथॉन स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकत
नाहीत; अन्यथा ते आंतरराष्ट्रीय कीर्तीचे धावपटू म्हणून नावारूपाला आले असते,’ असे ग्रामस्थांनी सांगितले. (प्रतिनिधी)

घटनास्थळाचे दृश्य विदारक
मोळाचा ओढा येथील घटनास्थळी सुमारे दीड ते पावणेदोन तास चाललेली धावपळ आणि वजनदार लोखंडी ढिगाऱ्याखालून कामगारांना बाहेर काढण्याची धडपड यामुळे परिसरात हलकल्लोळ उडाला होता. जेसीबी, गॅसकटर, क्रेन या सर्वच साधनांचा वापर केला जात होता. सुमारे अठ्ठावीस टन लोखंडी पत्रे ओढून बाहेर काढण्याच्या प्रयत्नात काही कामगारांचे हात फाटले. दरम्यान, डॉक्टरांचे पथक आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली होती. लोखंडाखाली अडकलेल्या कामगारांना दिलासा देण्यासाठी काही जण वारा घालत होते. काही जण त्यांना धीर धरण्यास सांगत होते. क्रेनच्या साह्याने शीट बाजूला केल्यानंतर मात्र रक्ताचे थारोळे साचलेले पाहावे लागले.

दुर्घटनेची माहिती समजताच मी आणि काही कार्यकर्ते घटनास्थळी धावलो. कामगारांच्या अंगावर पडलेले पत्रे उचलण्याचा प्रयत्न आम्ही कसोशीने करीत होतो. कोणत्याही परिस्थितीत कामगाराला वाचवायचेच, अशा निर्धाराने प्रयत्न केले. मात्र, पत्रे वजनदार असल्यामुळे ते बाहेर काढण्यात अडथळे येत होते. प्रयत्न करूनही दोघांपैकी एका कामगाराचा मृत्यू झाल्याचे समजताच अतोनात दु:ख झाले.
- संजय पाटील, पंचायत समिती सदस्य

Web Title: Workers killed by 28 tons of paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.