कामगारांनी कंपनीला सहकार्य करावे
By admin | Published: November 21, 2014 09:11 PM2014-11-21T21:11:09+5:302014-11-22T00:20:14+5:30
वाई : उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत विविध मागण्यांचे निवेदन
वाई : ‘उद्योग चालले तरच कामगारांचा उदरनिर्वाह होईल, त्यासाठी कामगारांनीही कंपनी व्यवस्थापनास सहकार्य करावे. तरच हे उद्योग जगू शकतात,’ असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.
येथील औद्योगिक वसाहतीतील गरवारे कंपनीच्या सुमारे दोन हजार कंत्राटी कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप केला होता. याप्रसंगी शिवप्रताप माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने खासदार उदयनराजे भोसले यांनी कामगारांच्या मागण्यांचे निवेदन व्यवस्थापनास दिले. यावेळी ते बोलत होते. यावेळी विजयसिंह नायकवडी, काशीनाथ शेलार, विजया भोसले, महेंद्र धनवे, युनियनचे अशोक सावंत, रणजित माने, विकास गाढवे, वहिवाटदार चंद्रकांत भोसले, अजय मांढरे, गरवारे कंपनीचे अधिकारी सुरेश वैद्य, वैभव जोशी आदी उपस्थित होते.
औद्योगिक वसाहतीतील चांदणी चौकात गरवारे कंपनीतील कंत्राटी कामगार जमा झाले होते. यात महिला कामगारांचा मोठा सहभाग होता. दुपारी तीनच्या सुमारास खासदार उदयनराजे भोसले येथे आल्यानंतर त्यांनी कामगारांशी चर्चा केली. आपल्या सर्व समस्या सोडविण्यासाठी मी कसोशीने प्रयत्न करीन, असे सांगून प्रमुख कामगारांसह कंपनीत जाऊन व्यवस्थापनास मागण्यांचे निवेदन दिले. तसेच व्यवस्थापनाने संप केलेल्या कामगारांविषयी कोणताही आकस मनात बाळगू नये, त्यांना त्रास देऊ नये, त्यांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी, असे सांगितले.
निवेदनात म्हटले आहे की, आम्ही गरवारे कंपनीचे कंत्राटी कामगार असून, गेली पाच ते पंधरा वर्षे कंपनीत कार्यरत आहोत. तरीही आम्हास सुविधा मिळत नाहीत. आम्हाला शासकीय परिपत्रकानुसार पगारवाढ मिळावी, अपघात झालेल्या कामगारांना सुविधा मिळाव्यात, कँटिनमध्ये सुविधा व कूपनमध्ये सवलत मिळावी, सेवेप्रमाणे पगारवाढ व्हावी, कामगारांना संरक्षण साहित्य मिळावे, पी. एफ. मधील अडचणी दूर व्हाव्यात, पार्किंगमध्ये सुविधा मिळावी, बोनस संदर्भातील अडचणी दूर व्हाव्यात.’
निवेदनावर कामगारांच्या सह्या आहेत. कामगारांमध्ये असंतोष असल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक रमेश गलांडे, भुर्इंजच्या सहायक पोलीस निरीक्षक सोनिया गोसावी, पाचगणीचे बाळासाहेब भरणे, प्रकाश खरात व पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता. (प्रतिनिधी)