मोरणा-गुरेघर कालव्यांची कामे अर्धवट स्थितीत

By admin | Published: December 25, 2016 11:42 PM2016-12-25T23:42:27+5:302016-12-25T23:42:27+5:30

कोट्यवधी रुपये पाण्यात : शेतकऱ्यांना लाभच नाही; ठेकेदारांचा गैरकारभार अन् निधीच्या चणचणीत शासनाची चालढकल

The works of motara-graveyard canals are in partial position | मोरणा-गुरेघर कालव्यांची कामे अर्धवट स्थितीत

मोरणा-गुरेघर कालव्यांची कामे अर्धवट स्थितीत

Next

पाटण : तालुक्याच्या मरळी-मोरणा परिसर अन् कऱ्हाडचा काही शेती परिसर सुजलाम् सुफलाम् करणारा मोरणा-गुरेघर मध्यम प्रकल्प आणि त्याद्वारे काढण्यात आलेले डावे आणि उजवे कालवे ही कामे बऱ्याच वर्षांपासून अर्धवट स्थितीत राहिल्यामुळे शेतकरी वर्गात संताप व्यक्त होत आहे. ठेकेदारांचा गैरकारभार, निधींची चणचण आणि सध्याच्या शासनाची चाल ढकल यामुळे मोरणा प्रकल्पाच्या दोन्ही कालव्यांची कामे ठप्प आहेत.
१९९६ मध्ये मोरणा नदीवरील मोरणा-गुरेघर प्रकल्पास कामाला सुरुवात झाली. त्यानंतर १५ वर्षे उलटली आणि मोरणा प्रकल्पातील पाणी साठवण करण्याची कामे पूर्ण झाली. जवळपास १ टीएमसी पाणीसाठ्याचा उपयोग शेतकऱ्यांच्या शेतीला आणि पिण्याच्या पाण्यासाठी होईल, अशी आशा निर्माण झाली होती. त्यासाठी दोन्ही बाजूंनी कालवे काढण्याचे काम सुरू झाले. कालव्यांची कामे वर्षभर चालली. ठेकेदारांना कोट्यवधी रुपये निधी दिला. मात्र, कालव्यांच्या कामांना पुढे दृष्ट लागली आणि चार ठेकेदारांची कामेच बंद पडली. या कामात कुणी गैरव्यवहार केला तर शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन त्यांना मोबदला दिला नाही, असे आरोप झाले. शासनाने पुढे कालव्यांच्या कामांना निधीच न दिल्यामुळे ठेकेदारांनी आपले चंबुगबाळे उचलून पलायन केले. त्यामुळे आजची परिस्थिती पाहता शेतकऱ्यांच्या शेतात कालव्यांच्या अर्धवट कामांमुळे अडचण होऊन बसली आहे. मोठमोठे खड्डे काढून ठेवल्यामुळे कालव्यांच्या आजूबाजूची शेती नापिक झाली आहे. याला जबाबदार कोण? असा सवाल शेतकरी विचारत आहेत.
मोरणा-गुरेघर प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा असून, त्या प्रकल्पाच्या अवतीभोवतीचा परिसर निसर्गरम्य आहे. या प्रकल्पाचे अधिकारी कोणी पुण्यात तर कोण साताऱ्यात राहतात. त्यामुळे मोरणा प्रकल्पाला लॅण्डमाफियांचा विळखा पडला असून, पाणी साठ्यालगत जमिनी काबीज केल्या आहेत. कोणी फार्महाउस तर कोणी बोटिंग करण्यास सुरुवात केली आहे. हे रोखण्यासाठी संबंधित लोकप्रतिनिधी व कृष्णा खोरे महामंडळाचे अधिकारी का पुढे येत नाहीत? भविष्यात या अतिक्रमणांची वनविभाग व कृष्णा खोरे आणि व्याघ्र प्रकल्प विभागाने दखल घेतली नाही तर मोरणा प्रकल्प हायजॅक होईल, अशी भीती व्यक्त होत आहे.
पाटण तालुक्यातील गोकूळ तर्फ पाटण, धावडे, कोरडेवाडी, आंब्रग, शिद्रूकवाडी, पेठशिवापूर, मोरगिरी, कुसरूंड, नाटोशी, आडदेव, कोंदळ, बेलवडे, आंब्रुळे, सोनवडे, सुळेवाडी, गव्हाणवाडी, पापर्डे, साजूर, गारुडे आदी गावांना मोरणा-गुरेघर प्रकल्पांचा लाभ होणार आहे.
‘मोरणा-गुरेघर प्रकल्पातून शंभर मीटरपर्यंत पाणी उचलून द्यावे आणि प्राधान्याने या प्रकल्पासाठी त्याग करणाऱ्या धरणग्रस्तांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी द्यावे, अशी आग्रही मागणी आमदार शंभूराज देसाई यांनी केली आहे. रखडलेली प्रकल्पांची कामे सुरू करण्यास आपण प्रयत्नशील,’ असे आमदार देसाई म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: The works of motara-graveyard canals are in partial position

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.