जग बदल घालूनी घाव...
By admin | Published: December 6, 2015 10:48 PM2015-12-06T22:48:47+5:302015-12-07T00:31:16+5:30
महामानवाला अभिवादन : महापरिनिर्वाण दिनानिमित्त साताऱ्यात ठिकठिकाणी घुमले ‘जयभीम’ चे नारे
सातारा : ‘जग बदल घालूनी घाव, सांगून गेले मला भीमराव,’ या एकाच वाक्यात ज्यांचे जीवितकार्य संक्षिप्तरूपात सामावले आहे, असे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ५९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सातारा शहरात ‘जयभीम’चे नारे घुमले. विविध कार्यक्रम, उपक्रमांतून महामानवाला अभिवादन करण्यात आले. सायंकाळी आंबेडकरांच्या अनुयायांनी काढलेला ‘कॅन्डल मार्च’ लक्षवेधी ठरला. नगरपालिकेसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात सकाळपासूनच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांसह नागरिकांची गर्दी होऊ लागली होती. सकाळी साडेदहाच्या सुमारास रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, भारिप-बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, भारतीय बौद्ध महासभेचे ज्येष्ठ धम्मसेवक शंकरराव सोरटे, ‘उपरा’कार लक्ष्मण माने, पार्थ पोळके, कास्ट्राइब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुशीलकुमार कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.दिवसभर शहराच्या विविध भागांतून डॉ. आंबेडकरांच्या अनुयायांचे जत्थेच्या जत्थे ‘जयभीम’चे नारे देत पुतळा परिसरात दाखल होत होते. विविध राजकीय पक्ष, संघटना तसेच सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी महामानवाला अभिवादन करण्यासाठी येत होते. बहुसंख्य अनुयायी पांढरीशूभ्र वस्त्रे परिधान करून आदरांजली वाहण्यास येत होते. विशेष म्हणजे, महिलांची संख्या लक्षणीय होती.पुतळा परिसरात उभारलेले पुस्तकांचे स्टॉल लक्ष वेधून घेत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली, तसेच त्यांच्यावर अभ्यासकांनी लिहिलेली असंख्य पुस्तके स्टॉलवर ठेवण्यात आली होती. दिवसभरात या पुस्तकांची विक्रीही मोठ्या प्रमाणावर झाली. पुतळा परिसरात भावनिक वातावरण होते. सायंकाळी सातच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या सदर बझार येथील निवासस्थानापासून भीमाई स्मारकापर्यंत काढलेला ‘कॅन्डल मार्च’ अज्ञानाच्या अंधकारावर ज्ञानाच्या विजयाची ग्वाही देणारा ठरला. ‘बुद्धम सरणम गच्छामी, धम्मं सरणम गच्छामी, संघम सरणम गच्छामी’ या त्रिसरणाचा उच्चार करीत शेकडो स्त्री-पुरुष ‘मार्च’मध्ये सहभागी झाले होते. घराघरातील महिला बाहेर पडून मार्चमध्ये सहभागी झाल्या. (प्रतिनिधी)
जब तक सूरज-चॉँद रहेगा...
डॉ. आंबेडकर पुतळा परिसरात सकाळी त्रिसरण आणि पंचशील ग्रहण करण्यात आले. त्यानंतर बाबासाहेबांच्या शेकडो अनुयायांनी काही क्षण उभे राहून महामानवाला अभिवादन केले. त्यानंतर शेकडो अनुयायांनी जोरदार घोषणा दिल्या. ‘जब तक सूरज-चाँद रहेगा, बाबा तेरा नाम रहेगा’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.