दिव्यंगत्वावर मात करून सावरला संसार; गाडे दाम्पत्याची संघर्षमय कहाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 11:10 PM2018-12-02T23:10:56+5:302018-12-02T23:11:00+5:30
सातारा : दुर्दम्य इच्छाशक्ती व प्रचंड आत्मविश्वास असेल तर दिव्यांग मनुष्यदेखील पर्वत ओलांडून जाऊ शकतो. ही गोष्ट सुभाषित कोंडवे ...
सातारा : दुर्दम्य इच्छाशक्ती व प्रचंड आत्मविश्वास असेल तर दिव्यांग मनुष्यदेखील पर्वत ओलांडून जाऊ शकतो. ही गोष्ट सुभाषित कोंडवे येथील अपंग रवींद्र गाडे व मंदाकिनी गाडे या दाम्पत्याने साध्य करून दाखविली आहे. दिव्यंगत्वावर मात करून रवींद्र गाडे यांनी स्वत:चा व्यवसाय व मंदाकिनी गाडे यांची संगणक परिचालिका म्हणून नोकरी करत जीवनाची वाटचाल सुरू केली आहे.
रवींद्र यांना बालपणात वयाच्या बाराव्या वर्षी स्पाँडिलायझरग्रस्त आजार झाला. त्यामुळे त्यांच्या खुब्यातील स्नायू जखडले गेल्याने त्यांना आपल्या पायावर उभे राहता येत नाही. त्यासाठी त्यांना कुबड्यांचा आधार घ्यावा लागतो. गरिबीमुळे त्यांच्यावर कोणतेही उपचार होऊ शकले नाही. त्यामुळे त्यांना दोन्ही पायाने कायमचे अपंगत्व आले. तरीही गाडे यांनी बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. दिव्यांग असल्याने खचून न जाता रवींद्र यांनी इलेक्ट्रिकचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेऊन टेक्निकल शिक्षणला सुरुवात केली.
त्यानंतर काही वर्षे समर्थ मंदिर येथील गजानन जाधव यांच्या दुकानात इलेक्ट्रिक वस्तू दुरुस्तीचा सराव केला. काहीतरी वेगळे करण्याची उमेद रवींद्र गाडे यांना स्वस्थ बसू देत नव्हती. दरम्यान, कुटुंबीयांच्या मदतीने त्यांनी कोडंवे येथे इलेक्ट्रिक वस्तू दुरुस्तीचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला त्यांच्याकडून लोक काम करून घेण्यास तयार नव्हते. त्यांच्याकडे नकारात्मक दृष्टीने पाहत होते. मात्र, गाडे यांनी आपल्या कामात दाखवलेली गुणवत्ता आणि सातत्यामुळे ग्राहकांचा त्यांच्यावर विश्वास बसू लागला. कष्ट करण्याची प्रवृत्ती, प्रचंड इच्छाशक्ती, आत्मविश्वास यामुळे व्यवसायाबरोबर त्यांचे उत्पन्न वाढू लागले.
त्यांनी स्वत:च्या लग्नासाठी मुली बघण्यास सुरुवात केली. दिव्यांग असल्याने अनेकांनी त्यांना नकार दिला. दरम्यान, उस्मानाबाद येथील मंदाकिनी यांचे स्थळ चालून आले. मंदाकिनी यांना ही लहानपणापासून अस्थिव्यंगामुळे अपंगत्व आले. दोघांनी लग्नानंतर आपल्या संसाराला सुरुवात केली. सुरुवातीला दोघांना काही समस्यांना तोंड द्यावे लागले. मंदाकिनी उच्चशिक्षित असल्याने कोंडवे ग्रामपंचायतीमध्ये त्यांना संगणक परिचालिकेची नोकरी चालून आली. ती मंदाकिनी यांनी स्वीकारली. गाडे दाम्पत्याला स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी कुबड्यांची आवश्यकता असते. मात्र, जीवनाच्या लढाईत दोघे एकमेकांचा हात धरून समर्थपणे वाटचाल करीत आहेत.
समाजात स्वत:ची ओळख निर्माण केली
रवींद्र गाडे यांनी अपंगत्वावर मात करून स्वत:चा व्यवसाय सुरू केला. उत्पन्न वाढीसोबत त्यांनी समाजात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. मात्र, त्यांचे लग्न करण्याची वेळ आली. तेव्हा त्यांना मुलगी देण्यास कोणी तयार नव्हते. अनेकांनी त्यांच्या कर्तृत्व आणि जिद्दीचे कौतुक आणि हेवा केला. मात्र, मुलगी देण्यास तयार नव्हते. मात्र, उस्मानाबाद येथील मंदाकिनी यांच्या वडिलांनी विश्वास दाखवून आपल्या मुलीशी रवींद्र यांचा विवाह लावून दिला.