औंधच्या यमाईची विड्याच्या पानांनी पूजा

By admin | Published: October 9, 2016 11:58 PM2016-10-09T23:58:55+5:302016-10-09T23:58:55+5:30

गुलाल-खोबऱ्यांची उधळण : ‘आई उदे गं अंबे उदे’चा जयघोष; सासनकाठ्या नाचवून प्रसाद वाटप

Worship of Ayadha Yama's Vita | औंधच्या यमाईची विड्याच्या पानांनी पूजा

औंधच्या यमाईची विड्याच्या पानांनी पूजा

Next

औंध : महाराष्ट्र तसेच उत्तर कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मूळपीठ निवासिनी श्री यमाईदेवीचा अष्टमी उत्सव येथील मूळपीठ डोंगर रविवारी ‘आई उदे, गं अंबे उदे’च्या जयघोषानं दुमदुमला. गुलाल-खोबरे उधळून, सासनकाठ्या नाचवून प्रसाद वाटण्यात आला. रविवारी खाऊच्या पानाची पूजा बांधली.
नवरात्रोत्सवानिमित यंदाही येथील मूळपीठ डोंगरावरील श्री यमाईदेवी, ग्रामनिवासिनी श्री यमाईदेवी, राजवाड्यातील कराडदेवी येथे नियमित विविध धार्मिक कार्यक्रमांचे मागील सात दिवसांपासून सुरू आहे.
यामध्ये मंत्रपठण, मंत्र पुष्पांजली, महाआरती याबरोबरच कीर्तन व अन्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. आठव्या दिवशी यमाईदेवीचा अष्टमी उत्सव मूळपीठ डोंगरावर असल्याने सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी होती. यामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईसह राज्याच्या विविध भागातून तसेच कर्नाटक तसेच अन्य भागातून मोठ्या प्रमाणात भाविक देवीच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी मूळपीठ डोंगरावर प्रचंड गर्दी झाली होती.
दुपारी मूळपीठ डोंगरावर अष्टमी उत्सवानिमित श्री यमाई देवस्थानच्या मुख्य विश्वस्त गायत्रीदेवी पंतप्रतिनिधींच्या हस्ते देवीच्या उत्सवमूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी पौरोहित्यपठण गणेश इंगळे यांनी केले.
त्यानंतर वाद्यवृंदाची सलामी देऊन पालखी मंदिर प्रदक्षिणा सुरूझाली. यावेळी विविध गावांच्या मानाच्या सासनकाठ्या श्रद्धेने नाचविण्यात आल्या. यावेळी तेलभूते, ढोल, सनई, हलगीवादकांनी तसेच कलाकारांनी आपली सेवा देवी चरणी सादर केली. पालखी प्रदक्षिणेवेळी मूळपीठ डोंगरावरील दत्त मंदिर, देवीच्या पादुका, घाटशिळ, बनबुवा तसेच पालखीने भेटी देऊन त्याठिकाणी मानाचे पानसुपारीचे विडे ठेवून पाच प्रदक्षिणा पूर्ण करण्यात आल्या. यावेळी गायत्रीदेवी पंतप्रतिनिधींच्या हस्ते उपस्थित हजारो भाविकांना केळी, पेरू, काकडी आदी फळांचा प्रसाद वाटप करण्यात आले. त्यानंतर पुन्हा देवीच्या उत्सवमूर्तीची पुन्हा मंदिरात प्रतिष्ठापना केली. त्यानंतर महाआरती करण्यात आली. वाद्यवृंदाची सलामी देण्यात आली.
अष्टमी उत्सवनिमित पंचायत समिती सदस्या सोनाली खैरमोडे, सरपंच रोहिणी थोरात, उपसरपंच बापूसाहेब कुंभार, हणमंतराव शिंदे, राजेंद्र माने, आब्बास आतार, शंकरराव खैरमोडे, वसंत देशमुख, प्रकाश पवार, दीपक कदम, प्रशांत खैरमोडे, उमेश थोरात, प्रकाश पवार, शामपुरी महाराज, मधुरा टोणे, रवींद्र थोरात, शहाजी यादव विविध मान्यवर, देवीचे सर्व मानकरी, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
काळूबाईचा आज जागर
महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मांढरगडावरील काळूबाईचा जागर सोमवार, दि. १० रोजी होणार आहे. यामध्ये रात्री नऊ वाजता देवीची पालखी मांढरदेव गावातून काळूबाई मंदिरापर्यंत वाजत गाजत नेली जाणार आहे. त्यानंतर रात्री नऊ ते बारा या वेळेत देवीचा जागर होणार आहे. सोमवार जागर अन् मंगळवारी देवीच्या वारादिवशीच दसरा असल्याने नेहमीपेक्षा यंदा मोठ्या संख्येने भाविक दाखल होण्याची शक्यता आहे.
नवव्या माळेला
देवीच्या दर्शनाला वरुणराजा
नवरात्रोत्सवातील नववी माळ रविवारी होती. सुटीचा दिवस असल्याने मांढरगड शेकडो भाविकांनी फुलून गेला होता. दुपारी तीनच्या सुमारास चक्क पावसानेही हजेरी लावली. सुमारे एक ते दीड तास चांगला पाऊस झाला.
विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव
अंबेदरे (जाधववाडी, ता. सातारा) येथे नवजवान दुर्गोत्सव मंडळाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. दांडिया, संगीत खुर्ची, हळदी-कुंकू समारंभ, रेकॉर्ड डान्स, रांगोळी स्पर्धा, नाटक यांचे आयोजन केले जाते. रोज सकाळी व सायंकाळी आरती, दांडिया व विविध स्पर्धा पाहण्यासाठी परिसरातील आबालवृध्दांसह महिलांची मोठ्या संख्येने गर्दी होत असते. रविवारी सकाळी होम-हवन, गोंधळ, भजन आदी कार्यक्रम झाले. सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच विजेत्यांना बक्षिसरूपी शालेय साहित्यांचे वाटप केले जाते.
 

Web Title: Worship of Ayadha Yama's Vita

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.