अवकाळीचा सर्वाधिक फटका फलटणला
By admin | Published: March 15, 2015 10:23 PM2015-03-15T22:23:40+5:302015-03-16T00:15:59+5:30
शासकीय पंचनाम्यातून माहिती उघड : ८७८ शेतकऱ्यांचे झाले नुकसान
फलटण : जिल्ह्यात फेबु्रवारीच्या अखेरीस झालेल्या अवकाळी पाऊस, गारपिटीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून सर्वाधिक फटका फलटण तालुक्याला बसला असल्याचे शासकीय पंचनाम्यातून स्पष्ट झाले आहे. गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने एक हजार पस्तीस शेतकऱ्यांच्या १३३.८६ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये ५० टक्क््यांवर काढणीला आलेल्या गव्हाचे सर्वाधिक ७८.०६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यानंतर रब्बी ज्वारीचे ४६.६२ हेक्टर बाधित झाले आहे. हरभऱ्याचे २.९४, फळांचे ४.३९, द्राक्षाचे १.८५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. फलटण तालुक्यात सर्वाधिक ८७८ शेतकऱ्यांचे १११.२० हेक्टर क्षेत्र, तर कऱ्हाड तालुक्यातील १५७ शेतकऱ्यांचे २२.६६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.
सातारा, कोरेगाव, खटाव, पाटण, वाई, महाबळेश्वर, जावळी, खंडाळा, माण तालुक्यांतही अवकाळीमुळे मोठे नुकसान झाले आहे. परंतु या परिसरातील नुकसानीची टक्केवारी ५० टक्क्यांच्या आत असल्याने या शेतकऱ्यांना मदतीवाचून वंचित राहावे लागणार की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यापूर्वीच्या शासनाच्या काळात कर्जमाफीमध्ये सरसकट शेतकरी पात्र ठरले होते. परंतु यंदा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार की नाही, याची सांशकता आहे. १२०० शेतकऱ्यांची नावे सावकारांच्या कर्जमाफीसाठी कळविण्यात आली होती. असे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने दिलेल्या अहवालामध्ये नमुद आहे. सातारा जिल्ह्यातील अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत. या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी देण्याचा विचार शासनस्तरावर सुरू आहे. शेतकऱ्यांना शासनाने कर्जमाफीचा दिलास दिल्यास शेतकरी वर्ग या धक्क्यातून सावरून आणखी झेप घेईल. फलटण तालुक्यामध्ये रब्बी पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. शासनाने केवळ घोषणा करून शेतकऱ्यांच्या तोडांला पाने पुसू नयेत, अशी शेतकऱ्यांची म्हणणे आहे. (वार्ताहर)
वशीलेबाजीमुळे मदतीपासून वंचित..!
सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पिकांचे नुकसान होत आहे. हाता तोंडाला आलेली पिके शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत नाहीशी होत असल्यामुळे शेतकरीवर्ग आणखीनच हतबल होत आहे. शासनाकडून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळते. परंतु ज्या शेतकऱ्यांचे ५० टक्के क्षेत्राचे नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांनाच मिळते. या पेक्षा कमी नुकसान असणाऱ्या शेतकऱ्यांना काहीच मिळत नाही. त्यामुळे शासनाच्या मदतीपासून हजारो शेतकरी वंचित राहतात. काहीवेळेला पंचनाम्यामध्ये वशीलेबाजी सुरू असते. आपल्या जवळच्या शेतकऱ्याचे किंवा नातलगाचे नाव यादीमध्ये घालतल्याची यापुर्वी अनेक किस्से घडले आहेत.