व्वा रे दानशूर... एका हातात केळी; दुसऱ्या हातात ‘सेल्फी’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:37 AM2021-05-16T04:37:35+5:302021-05-16T04:37:35+5:30
काहींचे खायचे दात वेगळे अन् दाखवायचे दात वेगळे असतात. मदत देताना ‘सेल्फी’ काढणाऱ्यांचंही असंच आहे. त्यांच्याकडून केली जाणारी मदत ...
काहींचे खायचे दात वेगळे अन् दाखवायचे दात वेगळे असतात. मदत देताना ‘सेल्फी’ काढणाऱ्यांचंही असंच आहे. त्यांच्याकडून केली जाणारी मदत ही केवळ ‘देखावा’ असून, दातृत्वाच्या नावाखाली स्वत:ची ‘इमेज’ बनविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. एका हाताने मदत देताना दुसऱ्या हाताने ते स्वार्थ साधतात. दातृत्वाच्या नावाखाली मदतीचा ‘देखावा’ करतात. गरजूंना गरजू न समजता त्यांना मदत करून उपकार करीत असल्याची जाणीव करून देतात. वास्तविक, मदत करताना त्याचे ‘फोटोसेशन’ करण्याची गरज नसते. मात्र, ज्यांना केवळ देखावा करायचा असतो, असे अनेक स्वयंघोषित दानशूर मदत देताना त्याचे फोटो काढून ते सोशल मीडियावर टाकतात. त्यातून स्वत:चे दातृत्व दाखवून देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
कोरोनामुळे गत वर्षभरापासून सामाजिक जीवन ढासळले आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांचे सामाजिक आणि मानसिक खच्चीकरण झाले आहे. उद्योग, व्यवसाय बंद पडल्यामुळे आणि नोकरी गेल्याने अनेकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. मिळकत बंद झाल्यामुळे अनेक कुटुंबांची अन्नान्न दशा सुरू आहे. या कालावधीत सामाजिक संस्थांनी, तसेच दानशूरांनी माणुसकी जपत गरजूंना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला असून, ही मदत संबंधित कुटुंबांना उभारी देण्यासाठी निश्चितच फायदेशीर आहे. मदत करतानाही अनेक संस्था, तसेच दात्यांनी त्याचे भांडवल केलेले नाही. काहींनी लाखो रुपये खर्च केले; पण त्याची कुणाला कसलीच खबरबात लागू दिलेली नाही. अन्नाची पाकिटे, धान्याचे किट, तसेच इतर साहित्य कुणालाही न समजता गरजूंपर्यंत पोहोचविणारे खरे दानशूर; पण शंभर रुपयात तीन डझन केळी घेऊन गरजूंना त्याचे वाटप करणाऱ्या आणि त्याचे फोटो काढून सोशल मीडियावर टाकणाऱ्यांना काय म्हणावं..?
- संजय पाटील
फोटो : १५केआरडी०१
कॅप्शन : प्रतीकात्मक