कुस्तीत ताकदीबरोबर बुद्धिकौशल्य, शिस्तीची आवश्यकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:45 AM2021-03-01T04:45:14+5:302021-03-01T04:45:14+5:30
फलटण : ‘कुस्तीमध्ये प्रावीण्य मिळविण्यासाठी ताकदीबरोबरच बुद्धिकौशल्य, शिस्त व शांत डोक्याची अत्यंत गरज आहे. त्याद्वारे कुस्तीमध्ये विजयश्री प्राप्त ...
फलटण : ‘कुस्तीमध्ये प्रावीण्य मिळविण्यासाठी ताकदीबरोबरच बुद्धिकौशल्य, शिस्त व शांत डोक्याची अत्यंत गरज आहे. त्याद्वारे कुस्तीमध्ये विजयश्री प्राप्त करता येते. तरुणांनी मातीबरोबरच मॅटवरील कुस्तीतही नाव कमवावे,’ अशी अपेक्षा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केली.
संस्थानकालीन शुक्रवार तालीम इमारतीचा विस्तार, जुन्या इमारतीची दुरुस्ती, अन्य विकास कामांसाठी नगरसेवक किशोरसिंह नाईक-निंबाळकर व प्रगती जगन्नाथ कापसे यांनी नगरपरिषदेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेल्या १५ लाख रुपयांच्या निधीतील विकास कामांच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे सदस्य विश्वजितराजे नाईक-निंबाळकर उपस्थित होते.
संजीवराजे म्हणाले, ‘फलटण संस्थानचे भूतपूर्व अधिपती मालोजीराजे राजेसाहेब यांच्या अगोदर संस्थान काळापासून शुक्रवार पेठ तालमीने कुस्ती व अन्य खेळांची परंपरा जपली आहे. येथून उत्तम पैलवानांप्रमाणे उत्तम कबड्डीपटू निर्माण झाले. यामध्ये हिंदकेसरी मारुती माने, श्रीरंग पैलवान यांनी कुस्तीचे धडे दिले आहेत. आपल्याकडे मातीवरील कुस्तीमध्ये अनेकांनी प्रावीण्य मिळविले आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कुस्तीमध्ये मॅटवरील कुस्तीला प्राधान्य दिले जात असल्याने त्याप्रकारचे शिक्षणही येथे दिले गेले पाहिजे.’
संजीवराजे म्हणाले, ‘पट्टीचे, तरबेज पैलवान असलेल्या खाशाबा जाधव यांना राष्ट्रीय स्पर्धेत ब्राॅन्झ पदकावर समाधान मानावे लागले. मारुती माने यांनी एकाचवेळी मातीवरील व मॅटवरील कुस्ती खेळली. त्यामध्ये मातीवरील कुस्तीमध्ये त्यांना सुवर्णपदकाने गौरविण्यात आले, मात्र मॅटवरील कुस्तीमध्ये त्यांना ताम्रपदकावर समाधान मानावे लागले. येथे दोन्ही प्रकारच्या कुस्ती प्रकारात प्रशिक्षण देण्याची गरज आहे. अलीकडे मानवी आरोग्य अत्यंत चिंताजनक झाले असल्याने प्रत्येकाने आरोग्याला प्राधान्य देण्याची गरज आहे. लहान वयात गंभीर आजार होत असल्याने कुस्तीमध्ये सर्वांनाच प्रावीण्य मिळविता आले नाही तरी, कुस्तीमधील व्यायाम, मेहनत, शिस्त, आहार यामुळे आरोग्य निरोगी ठेवून शरीरप्रकृती उत्तम राखणे शक्य आहे. त्यामुळे लहान वयापासून तालमीतील व्यायाम उत्तम व्यायाम आहे.’
माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, सुदाम मांढरे, चंद्रकांत शिंदे, संजय पालकर, नगरसेवक किशोर नाईक-निंबाळकर, जगन्नाथ कापसे, राहुल निंबाळकर, फिरोज आतार, आबा बेंद्रे, महंमद शेख, चंद्रकांत पालकर, ताजुद्दीन शेख, गणेश पालकर, बंटी गायकवाड, सनी शिंदे, पप्पू शेख, अभिजित जानकर यांच्यासह तालमीतील पैलवान, नागरिक उपस्थित होते.
फोटो २८फलटण-संजीवराजे
फलटण येथील संस्थानकालीन शुक्रवार तालीम इमारतीच्या विस्तारप्रसंगी संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. (छाया : नसीर शिकलगार)