लोणीच्या मैदानात रंगला कुस्तीचा थरार, सुरज निकमने विजयी
By Admin | Published: April 14, 2017 03:52 PM2017-04-14T15:52:28+5:302017-04-14T15:52:28+5:30
खटाव येथे झालेल्या कुस्ती मैदानात धुमछडी आखाड्याचा मल्ल सुरज निकम याने दहाव्या मिनिटाला पोकळ घिस्सा डावावर कोल्हापूरच्या मारुती जाधव याला पराभूत करून एक लाख रुपये इनाम पटकावले.
>ऑनलाइन लोकमत
औंध(सातारा) दि. 14 - खटाव येथे झालेल्या कुस्ती मैदानात धुमछडी आखाड्याचा मल्ल सुरज निकम याने दहाव्या मिनिटाला पोकळ घिस्सा डावावर कोल्हापूरच्या मारुती जाधव याला पराभूत करून एक लाख रुपये इनाम पटकावले. मैदानात इतर गटात झालेल्या प्रेक्षणीय लढतींनी उपस्थीतांची मने जिंकली.
येथील श्रीहनुमान यात्रेनिमित्त ग्रामस्थांच्या वतीने कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समाजकल्याण सभापती शिवाजीराव सर्वगोड, पंचायत समिती सभापती संदीप मांडवे, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप विधाते, महाराष्ट्र केसरी धनाजी फडतरे, गोरख सरक माणिक पवार, जीवन कापले, विकास जाधव, मोहन कनवाळू, संभाजीराव फडतरे, कँ. शिवाजी निकम, जालींदर राऊत, शंकर रणनवरे, अमृत फडतरे, विश्वंभर रणनवरे योगेश फडतरे, घनश्याम काळे, राजेंद्र्र शिंदे, शरद शिंदे, रामचंद्र शिंदे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रथम क्रमांकाच्या लढतीत मारुती जाधव व सूरज निकम यांच्यात १० मिनिटे कुस्ती चालली. मैदानात सर्व प्रेक्षकांची ही कुस्ती पाहताना अभूतपूर्व शांतता होती. मारुती जाधव आक्रमक तर सुरज निकम शांतपणे लढत होता. समोरून झोळी बांधण्याचा मारुतीचा प्रयत्न अपयशी ठरवत सुरजने त्यांच्यावर ताबा घेउन पोकळ घिस्सा डावावर त्याला धूळ चारली. सुरजने कुस्ती जिंकताच मैदानात कुस्ती शौकिनांनी जल्लोष केला.
मैदानात पंच म्हणून विकास जाधव, गणेश फडतरे, महेंद्र फडतरे, अर्जून पाटील, श्रीमंत फडतरे, श्रीनिवास शिंदे, बाबूराव साठे, अधिक जाधव यांनी काम पाहिले.
स्पर्धेतील इतर विजेते
द्वितीय क्रमांकाची कुस्ती प्रशांत शिंदे जाखणगांव विरुद्ध अनिल जाधव पुणे ही कुस्ती बरोबरीत सुटली. तृतीय क्रमांकाच्या लढतीत सोन्या सोनटक्के (कोल्हापूर) याने पारगावच्या शरद पवार याला घुटना डावावर आसमान दाखवले. कोल्हापूर येथील सरदार सावंत याने गणेश कुनकुले (पुणे) याला बँक थ्रो डावावर चितपट करून उपस्थीतीतांची वाहवा मिळवली. तसेच मनोज कदम (नांदोशी), स्वप्नील पाटील (कोल्हापूर), दत्ता नरळे (सांगली), कनैय्या माने, नितीन उमापे, संग्राम सुर्यवंशी (लांडेवाडी), अक्षय देवकर, (लोणी), ऋषिकेश साठे (भोसरे) यांनी चटकदार कुस्त्या करुन उपस्थितांची वाहवा मिळवली.