वाई कृषी उत्पन बाजार समितीत हळदीला उच्चांकी २९ हजार प्रतीक्विंटल दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 03:00 PM2021-03-05T15:00:50+5:302021-03-05T15:02:45+5:30
वाई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळद लिलावात मोहन ओसवाल यांच्या काट्यावर बावधन येथील प्रगतशील शेतकरी गणेश विश्वास कदम यांनी कष्टातून पिकविलेल्या हळद या पिकला २९ हजार इतका उच्चांकी दर मिळाला.
वाई : वाई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळद लिलावात मोहन ओसवाल यांच्या काट्यावर बावधन येथील प्रगतशील शेतकरी गणेश विश्वास कदम यांनी कष्टातून पिकविलेल्या हळद या पिकला २९ हजार इतका उच्चांकी दर मिळाला.
भुईंज येथील शेतकरी संदीप ज्ञानेश्वर भोसले यांच्या हळदीला २५ हजार इतका उच्चांकी दर मिळाला. बाजार समितीत सरासरी दोन हजार पोत्यांची आवक होऊन त्यातील सरासरी दर ९ हजार रुपयांपासून १२ हजार रुपयांपर्यंत पोहोचला. असे उच्चांकी दराने वाई येथे हळदीचे लिलाव झाल्यामुळे वाई तालुक्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण पसरले आहे.
वाई तालुका हा सातारा जिल्ह्यामध्ये हळदीचे आगार म्हणून ओळखला जातो. ओझर्डे, पांडे, खानापूर, फुलेनगर, बावधन, भुईंज, शिरगाव, कवठे, व्याजवाडी येथील प्रगतशील शेतकरी पिढ्यानपिढ्या हळद पिकांचा वाण जपण्यासाठी प्रसंगी सोसायटी, खासगी सावकार व हातउसने व घरातील दागिने गहाण ठेवून हजारो रुपयांचे शेणखत व हळद पिक उत्पादनासाठी इतर एकरी ४० हजाराच्या रुपयांच्या आसपास खर्च करीत असतात.
त्याचबरोबर शेतीची मशागत, रासायनिक खत व उत्तम प्रतीची बियाणे मिळविण्यासाठी असा लाखो रुपये खर्च करून स्पर्धात्मक हळदीचे पिक घेताना दिसून येतात पण गेल्या पाच ते सहा वर्षापासून राज्यातील सर्वच बाजार समितींच्या काट्यावर क्विंटलला ४ ते ५ हजार रुपये दर प्राप्त होत होता.
त्यावेळी शेतकरी नाराज होऊन कवडीमोल दराने आपल्या हळदीची विक्री करीत होता. पण आजपर्यंत हळद शेतकऱ्यांचे कंबरडे मोडलेले असतानाही शेतकऱ्यांनी हळदीचा बिवड जपून ठेवल्याने त्याला ९ हजार रुपयांपासून २९ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळू लागला.
यामुळे शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण पसरले आहे. तरी वाई तालुक्यासह परिसरातील तालुक्यातील शेतकऱ्यांनी हळद पिकाला जादा दर मिळविण्यासाठी वाई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणावा व शेतकऱ्याने जास्तीत जास्त दर आपल्या पदरात पाडून घ्यावा असे आवाहन वाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय लक्ष्मणराव पिसाळ, उपसभापती व सर्व संचालकांनी केले आहे़.